Dehuroad News : केंद्रीय विद्यालय परिसरात खोदकाम करताना सापडला ब्रिटिशकालीन बाॅम्ब

एमपीसी न्यूज – देहूरोड येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक दोन येथे बुधवारी (दि. 30) सकाळी खोदकाम करताना ब्रिटिशकालीन बाॅम्ब सापडला. जेसीबीच्या साह्याने हे खोदकाम सुरू होते. जेसीबी चालकाने बॉम्बची माहिती पोलिसांना दिली.

देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक दोनच्या मैदानात बुधवारी सकाळी जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू होते. त्यावेळी खोदकामात ब्रिटिशकालीन बाॅम्ब आढळला.

जेसीबी चालकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर पुणे शहर पोलिसांच्या बाॅम्ब शोधक व नाशक पथकाला तसेच संरक्षण दलाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. दोन्ही पथकांनी बाॅम्ब सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात दिला.

कायदेशीर कार्यवाहीनंतर बाॅम्बची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. दरम्यान, मागील आठवड्यात पुनावळे येथेही खोदकाम करताना ब्रिटिशकालीन बाॅम्ब सापडला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.