Wakad : देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्गावर खासगी बस पुलाच्या कठड्याला धडकून उलटली; 8 जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – वाकड येथे देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्गावर एका खासगी बसचा उलटून अपघात झाला. या अपघातात पाच वर्षांच्या एका चिमुरडीसह  8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (रविवार) पहाटे चारच्या सुमारास देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्गावर वाकड जवळ मुळा नदीच्या किना-यावर झाला.

स्वरा सचिन पाटील (वय 5), चंद्रशिला सचिन पाटील (वय 32, दोघी रा. बेलापूर, नवी मुंबई), दीपाली जाधव (वय 30), विद्या देवकर (वय 50), विनायक सावंत (वय 32), केदार बारके (वय 16, चौघे रा. मुंबई), स्नेहा भगत (वय 21, रा नवी मुंबई) आणि सचिन चिकसबर्गे (वय 26, रा. कोल्हापूर) अशी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली ते कोल्हापूर (MH 09 CV 3697) ही खासगी बस वाकड येथून देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्गावरून जात होती. पहाटे चारच्या सुमारास वाकड जवळ मुळा नदीच्या पुलावर बस आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलाच्या कठड्याला धडकली. बस वेगात असल्याने बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने ही बस नदीत पडली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, बस उलटल्याने बसमधील 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये बेलापूर न्यायालयाच्या न्यायधीश व त्यांची पाच वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. तर सचिन चिकसबर्गे सैन्य दलात कार्यरत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.