Chinchwad : चिंचवडमध्ये 8 फेब्रुवारी रोजी भरणार इलेक्ट्रीक उत्पादनांचे व्यावसायिक प्रदर्शन

असोसिएशनचे अध्यक्ष अनिल भंडारी यांची माहिती; सुमारे 100 उत्पादक आणि कंपन्या घेणार सहभाग

एमपीसी न्यूज – कन्सल्टिंग इलेक्ट्रिक इंजिनिअर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने इलेक्ट्रिक उत्पादनांचे भव्य व्यावसायिक प्रदर्शन चिंचवडमधील ऑटो क्लस्टर येथे भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 8 ते 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. प्रदर्शनात इलेक्ट्रिक क्षेत्रात आलेल्या नवनवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनांची माहिती, चर्चासत्र आणि प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अनिल भंडारी यांनी दिली.

यावेळी अनिल भंडारी म्हणाले, “इलेक्ट्रिक सुरक्षा, ऊर्जेची बचत आणि सौर उर्जेला चालना या तीन मुद्द्यांवर हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनात सुमारे 100 उत्पादक आणि कंपन्या सहभाग घेणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेल्या अभियांत्रिकी उपकरणे आणि पद्धतीबद्दल शास्त्रीय माहिती आणि वस्तुनिष्ठ मार्गदर्शन, उपकरणे आणि सामग्रीचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. उत्पादक आणि सल्लागार यांना जोडणारा दुवा या प्रदर्शनाच्या माध्यमातून साधला जाणार आहे. इलेक्ट्रिक क्षेत्रातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिक उत्पादनांची मोठी नगरी आहे. या उत्पादकांसाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. इलेक्ट्रिक अपघात हा सध्या भेडसावणारा प्रश्न आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातील संभाव्य धोके आणि उपाय याबाबत जाणून घेणे गरजेचे आहे. अनेक उत्पादक आणि जाणकार यामध्ये सहभाग घेणार असून महावितरणचे तज्ञ देखील उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत, असेही अनिल भंडारी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.