Hinjwadi: हिंजवडी ते चाकण मार्गावर पाच ‘एसी’ बस धावणार

आमदार जगताप यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्र्यांकडून तीन कोटींचा निधी मंजूर

एमपीसी न्यूज -हिंजवडी ते चाकण मार्गावर पाच वातानुकूलित बसेस (एसी) धावणार आहेत. या वातानुकूलित बस खरेदीसाठी राज्य सरकारकने तीन कोटी 30 लाखांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला लागून असलेल्या चाकण परिसराचे औद्योगिकीकरण झाले आहे. या भागात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपले उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे पुणे जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरच नव्हे; तर महाराष्ट्रातील लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. दुसरीकडे पिंपरी-चिंचवडलाच लागून असलेला हिंजवडीचा परिसरही आयटी हबमुळे जगाच्या नकाशावर झळकलेला आहे. हिंजवडीतही अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. चाकणचे औद्योगिकीकरण आणि हिंजवडी आयटी पार्कमुळे पिंपरी-चिंचवडची भरभराट होत आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी दररोज कामांसाठी जाणा-या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुढाकार घेत राज्य सरकारच्या निधीतून वातानुकूलित बस (एसी) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदार जगताप यांनी चाकण ते हिंजवडी दरम्यान वातानुकूलित बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्याला यश आले असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी चाकण ते हिंजवडी मार्गासाठी पाच वातानुकूलित बस खरेदीला मान्यता दिली आहे. तसेच या पाच बसेससाठी तीन कोटी 30 लाखांच्या निधीला मंजुरीही दिली आहे.

त्याचबरोबर दापोडी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा ते वाकड, काळेवाडी फाटा ते चिंचवड, एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपूल या मार्गावर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यासाठी सरकारने 70 लाखांचा निधी दिला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध व्यायामशाळांमध्ये व्यायामाचे साहित्य खरेदीसाठी 50 लाख आणि औंध ऊरो रुग्णालयाच्या परिसरात पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामे करण्यासाठीही आमदार 50 लाखांचा निधी मंजूर मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्यासाठी एकूण पाच कोटींचा निधी मंजूर केल्याचे जगताप यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.