MPC News Special : औद्योगिक परिसरातील खंडणीखोरी खपवून घेतली जाणार नाही

पोलीस आयुक्तांचा एमआयडीसी मधील गुन्हेगारांना सज्जड दम ; औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस सरसावले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (MPC News Special) कार्यक्षेत्रात येणाऱ्या औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस सरसावले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. कंपन्यांना हेतुपूर्वक त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे बैठकीत पोलीस आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे कंपन्यांमध्ये कुरापती करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

PMRDA : पेठ क्रमांक 12 गृहप्रकल्पातील सदनिकांची ताबा प्रक्रीया सुरु; पहिल्याच दिवशी 234 सदनिकांचे ताबे पूर्ण

पोलीस आयुक्तांनी जानेवारी महिन्यात एक बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर पोलिसांनी केलेल्या कठोर कारवाईची माहिती आताच्या देण्यात आली.  औद्योगिक क्षेत्रासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती, कामगार युनियन, माथाडी कामगारांच्या समस्या, माथाडी कामगार कायदा, चारित्र्य पडताळणी, वाहतूक नियोजन व अंमलबजावणी, सीसीटीव्ही कॅमेरे, कचरा आदि विषयांवर बैठकीत चर्चा झाली.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण एमआयडीसी ही सर्वात मोठी एमआयडीसी आहे. त्यानंतर भोसरी, तळेगाव, चिखली भागात देखील मोठ्या प्रमाणात उद्योग, कंपन्या आहेत. चोऱ्या ही एमआयडीसी मधील मोठ्या समस्यांपैकी एक आहे. चोऱ्यांसह इतर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी कंपन्यांकडून आजूबाजूच्या परिसरात चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे. रस्त्यावर कॅरेज वे वाढण्यासाठी व वाहतुकीची सुलभता होण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने कामगारांची वाहने कंपनीच्या आतील बाजूला पार्क करण्याची सोय करावी, असे आवाहन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले.

स्क्रॅप माल खरेदीसाठी जर कोणी धाक दाखवून दबाव आणत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. कंपन्यांनी पुढे येऊन तक्रार करावी. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आश्वासन देखील पोलीस आयुक्तांनी दिले आहे. एमआयडीसी परिसरात कामगारांचे अपघात ही मोठी समस्या आहे. त्यासाठी कामगारांना हेल्मेट वापरण्यासाठी कंपन्यांनी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.

कंपन्यांमधील खंडणीखोरी खपवून घेतली जाणार नाही
औद्योगिक क्षेत्रामधील कंपन्यांचे प्रतिनिधी व पोलीस यांची 19 जानेवारी रोजी एक बैठक पार पडली. त्यामध्ये कंपन्यांना भेडसावणाऱ्या तक्रारी बाबत न घाबरता पोलीसांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कंपन्यांकडून आलेल्या तक्रारीनुसार आजवर कंपन्यांमधील खंडणीखोरांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

औद्योगिक तक्रार निवारण कक्षाची स्थापना
कंपनी व्यवस्थापन अधिकारी व सदस्यांना कंपनी संदर्भाने कोणतीही समस्या, माथाडी कामगारांच्या संबंधी काही तक्रार असल्यास जवळच्या पोलीस स्टेशन, औद्योगिक तक्रार निवारण कक्ष ( इंडस्ट्रियल ग्रिव्हियन्स सेल) अथवा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास त्याची तात्काळ दखल घेवून संबंधीत खंडणीखोरांच्या विरोधात कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले आहे. औद्योगिक तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी औद्योगिक तक्रार निवारण कक्ष पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये खंडणी विरोधी पथकाअंतर्गत स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाकडे ईमेल ([email protected]), व्हाटस अप (9529691966) आणि डायल 112 याद्वारे तक्रार करता येणार आहे. तत्काळ पोलीस मदत मिळण्यासाठी वासुली फाटा येथे पोलीस मदत केंद्र देखील उभारण्यात येणार आहे.

औद्योगिक परिसरासाठी स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार
औद्योगिक क्षेत्रामध्ये जास्त मनुष्यबळ उपलब्ध करुन गुन्हयांना आळा बसविणे तसेच अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून विविध उपाय सुरु आहेत. त्यामध्ये एक अपर पोलीस आयुक्त व दोन पोलीस उप आयुक्त या पदांची निर्मिती करण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तो प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र परिमंडळ स्थापन करण्यात येणार आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनसाठी एमआयडीसी कडून एचपी चौक जमीन मिळाली आहे. त्या जागेत अद्ययावत पोलीस स्टेशन उभारण्यात येणार आहे.

कामगारांची पोलीस पडताळणी गरजेची
पिंपरी-चिंचवड शहराच्या (MPC News Special) औद्योगिक परिसरात महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांमधून देखील मोठ्या प्रमाणात कामगार आले आहेत. त्या कामगारांची पोलीस पडताळणी करणे आवश्यक आहे. कंपन्यांनी कंत्राट देताना त्यात पारदर्शकता ठेवावी. कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षक नेमताना त्यांचीही पोलीस पडताळणी करून घेणे गरजेचे आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.