Borghat Accident News : खंडाळा बोरघाटात रिक्षा व बसचा भीषण अपघात; 2 ठार, 2 जखमी

एमपीसी न्यूज : मुंबई पुणे जुन्या महामार्गावरचा खंडाळा बोरघाटातील सायमाळ येथे रिक्षा व बस यांच्यात झालेल्या भिषण अपघातात दोन जण ठार झाले तर दोन जण जखमी झाले आहेत. आज सकाळी 10.50 च्या सुमारास हा अपघात झाला. रिक्षा क्रमांक MH 14 HM 5296 मधून रेल्वेचे कर्मचारी लोणावळा येथील वेट अँड जॉय या वॉटर पार्क मध्ये आपली सुट्टी व्यतीत करून खोपोली रेल्वे स्टेशनकडे जात असताना, बोर घाटातील सायमाळ जवळच्या वळणावरील तीव्र उतारावर रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा पलटी होऊन खोपोली कडून पुण्याकडे निघालेल्या MH 04 G 9925 या प्रवासी बसच्या ड्रायव्हर साईडला धडकली.

हा अपघात एवढ्या गंभीर स्वरूपाचा होता की यातील कुमार गौरव गौतम वय 26 याचा जागीच मृत्यू झाला तर शत्रूंजय त्रिपाठी वय 27 हा गंभीर जखमी झालेला तरुण उपचारासाठी घेऊन जात असताना मयत झाला. राघवेंद्र राठोड, सौरभ पाठक, रिक्षा चालक किरण वाघमारे हे किरकोळ जखमी झाले आहेत. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर व त्यांचे कर्मचारी आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोचत त्यांनी सर्वांच्या सहाय्याने मदतकार्य करून जखमींना रुग्णवाहिकेतून पुढे हलवले. अपघात घडल्यानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक पोलीस बोरघाट डिव्हिजनचे पोलीस सब इन्स्पेक्टर अनिल शिंदे आणि डेल्टा फोर्सच्या जवानांनी वाहतूक सुरळीत केली.

मोबाईल चोरताना हटकले म्हणून रिक्षाचालकावर चाकुने केले वार

अपघातातील जखमी राघवेंद्र राठोड आणि सौरभ पाठक हे सहाय्यक लोको पायलट पदावर पश्चिम मध्य रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. तर कुमार गौरव गौतम आणि शत्रूंजय त्रिपाठी हे देखील सहाय्यक लोको पायलट पदावर पश्चिम मध्य रेल्वेमध्ये कार्यरत होते. रिक्षा चालक हा लोणावळा येथील रहिवासी असून तो खोपोली नगर पालिका रुग्णालयात उपचार घेत आहे. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर हे अपघाताचा तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.