Google Doodle : ‘महाराष्ट्र भूषण’ पुलंना गुगलकडून खास मानवंदना

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, प्रख्यात साहित्यिक, पु. ल. देशपांडे यांचा आज 101 वा जन्मदिवस, यानिमित्ताने गुगलने खास डुडलच्या माध्यमातून पुलंना मानवंदना दिली आहे.

गुगलकडून प्रत्येक दिनविशेषानिमित्त विशेष डुडल प्रसिद्ध करण्यात येत असते. तसेच या डुडलमध्ये पुलं हे पेटी वाजवताना दिसत आहेत. ‘गूगल आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर’ या विभागात पु ल देशपांडे यांच्या जीवनकार्याचा वेध यात घेतला आहे.

मुंबईत राहणाऱ्या समीर कुलावूर या कलाकाराने हे खास डुडल तयार केले आहे. पु. ल. देशपांडे यांच्या जीवनकार्याची संपूर्ण माहिती या डूडलच्या निमित्ताने मिळत आहे. या डूडलमध्ये पुलं हे पेटी वाजवताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या मागे त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशी विविध रंगांची उधळणही केल्याचं दिसत आहे.

पुलंचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी मुंबईत झाला होता. त्यांनी मराठी साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा विविध क्षेत्रात आपल्या कौशल्याची छाप पाडली होती. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु. ल. देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुलं अशा नावाने जनमानसात पोहोच असलेलं एक भन्नाट व्यक्तिमत्व.

लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक अशा कित्येक भूमिका त्यांनी बजावल्या. हजरजबाबीपणा ही त्यांची खास ओळख.

पु.ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. पुलंची व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक, गोळाबेरीज, असा मी असामी, अपूर्वाई, पूर्वरंग आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. तसेच पुलंनी गुळाचा गणपती, वंदे मातरम, दूधभात आदी चित्रपटात काम केले होते. पुलंनी आकाशवाणी आणि दूरदर्शनवरही काम केले होते. ते 1955 मध्ये आकाशवाणीमध्ये कामाला लागले होते. 1959 मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले होते.

तसेच दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. पुलंच्या साहित्यावर आधारित मालिका आणि चित्रपट निघाले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.