Dead Fish in Pawana : विषारी रसायने पाण्यात सोडल्याने रावेत बंधाऱ्यात मृत माशांचा खच

एमपीसी न्यूज – पवना नदीच्या किनारी असलेल्या कंपन्यांमधून विषारी रसायने पाण्यात सोडल्याने पवना नदीत असलेल्या विविध प्रजातींच्या माशांचा मृत्यू होत आहे. मागील आठवड्याभरात तीन वेळा रावेत बंधाऱ्यावर मृत माशांचा खच आढळून आला. यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पवना धरणापासून सुरू होणारी पवना नदी धामणे, जांबे, मामुर्डी, किवळे, रावेत मार्गे पिंपरी चिंचवड शहरातून जाते. पवना नदी ही पिंपरी चिंचवडकारांची जीवनवाहिनी आहे. पवना नदीवर असलेल्या रावेत बंधाऱ्यातून पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून पवना नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सातत्याने चर्चेत आहे.

स्थानिक नागरिक विशाल भोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात तीन वेळा पवना नदीच्या काठावर मृत माशांचा खच आढळला आहे. नदीमध्ये विषारी रसायने सोडणे, सांडपाणी सोडणे यामुळे नदीचे पाणी विषारी होत असून पाण्यात असलेल्या विविध प्रजातींच्या माशांचा मृत्यू होत आहे.

चार दिवसांपूर्वी महापौरांनी रावेत बंधाऱ्यावर भेट देऊन मृत माशांची पाहणी केली. तसेच नदी प्रदूषण करणाऱ्या संबंधित कंपन्या आणि नागरिकांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा आज मृत मासे आढळून आले आहेत.

पालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, “रावेत बंधाऱ्यातील पाण्याची चाचणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याला यापासून धोका निर्माण होईल अशी परिस्थिती नाही. तीन दिवसांपूर्वी पालिकेच्या एका पथकाने नदीमध्ये रसायने सोडणारे तीन टँकर पकडले आहेत. त्या टँकर मधील रसायनमिश्रित पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.