Hinjawadi : आयटी कंपनीतील अभियंत्यानेच केली कंपनीची पाच लाखांची फसवणूक

सायबर सेलने लावला छडा

एमपीसी न्यूज – सॉफ्टवेअर कंपनीच्या खात्यातून 5 लाख 9 हजार 764 रुपये कमी झाले. ही बाब कंपनीच्या लक्षात येताच कंपनीने याप्रकरणी तक्रार नोंदवली. पिंपरी-चिंचवड सायबर सेलने या गुन्ह्याची उकल केली. कंपनीत काम करणा-या सॉफ्टवेअर इंजिनीअरने त्याच्या मेहुण्याच्या मदतीने कंपनीच्या खात्यातून ही रक्कम ट्रान्स्फर केल्याचे उघडकीस आले आहे.

प्रवीण विष्णुदास राठी (वय 31, रा. शिवणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह नवनीत कृष्णकुमार मेहता (वय 27, रा. नागदा, जि. उज्जैन, मध्यप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजित अर्जुन कदम (वय 36, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित कदम यांची बालेवाडी येथे कंसिस्टी सिस्टीम प्रा. लि. नावाची सॉफ्टवेअर कंपनी आहे. त्यांनी डिसेंबर 2018 मध्ये ‘ऑल ई एंटरप्रायजेस’ नावाची कंपनी ई-टेंडरिंग आणि ऑनलाईन ट्रॅन्जेक्शनसाठी स्थापन केली. त्यासाठी ‘ऑल रिचार्ज’ नावाचे सॉफ्टवेअर तयार केले. या सॉफ्टवेअरमध्ये प्रीपेड, पोस्टपेड रिचार्ज, लाईट बिल, पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ऑल रिचार्ज सॉफ्टवेअरमध्ये एपीआय (ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) अप्लिकेशन बनवले. रिटेलर आणि एपीआय युझर्सना ट्रॅन्जेक्शन करण्यासाठी बालेवाडी येथील आयसीआयसीआय बँकेत खाते उघडले. त्या खात्यावरून सर्व ग्राहक आर्थिक देवाण-घेवाण करत असत. प्रवीण राठी याच कंपनीत आयटी अभियंता म्हणून काम करतो. त्याच्याकडे ऑल रिचार्ज या सॉफ्टवेअरचे युजरनेम आणि पासवर्ड होते. त्याचा गैरवापर करून प्रवीण याने त्याचा मेहुणा नवनीत याच्या बँक खात्यात 5 लाख 9 हजार 764 रुपये पाठवले. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावत प्रवीण याला अटक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.