Deven Chandra Thakur : भारताचा इतिहास बिहार पासून, तरीही बिहार विकासापासून कोसो दूर – देवेन चंद्र ठाकूर

एमपीसी न्यूज : बिहारमधील निवडणुका या (Deven Chandra Thakur) जातीच्या आधारावरच होतात. एखाद्या व्यक्तीने पाच वर्षात कितीही काम केले तरी शेवटी निवडणूक आल्यानंतर त्याची जात पाहूनच मतदान केले जाते. त्यामुळे भारताचा इतिहास बिहार राज्यापासूनच सुरू होऊनही, चाणक्य चंद्रगुप्त यांच्यासारखे थोर व्यक्ती बिहार राज्याचे असूनही अजूनही हे राज्य विकासापासून कोसो दूर असल्याचे मत बिहार विधान परिषदेचे सभापती देवेन चंद्र ठाकूर यांनी व्यक्त केले. ते रामकृष्ण हरी कृषि प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. देवेन चंद्र ठाकूर यांच्या हस्ते आज पुण्यातील एस एम जोशी सभागृहात बाळासाहेब लांडगे यांना जीवन गौरव पुरस्कार, तर माजी खासदार नानासाहेब नवले यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  

कुस्ती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे बाळासाहेब शंकरराव लांडगे यांना मानपत्र देऊन जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तुकाराम महाराज पगडी, गाथा आणि रोख 25 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तर, माजी खासदार नानासाहेब नवले यांना कृतज्ञता पुरस्कार देण्यात आला. मुळशी तालुक्यातील ताथवडे या गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कुस्तीत त्यांनी आपल्या कर्तुत्वाची मोहोर उमटवली. कुस्ती क्षेत्रासोबतच राजकारणातही त्यांनी उत्तम कामगिरी केली. जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे.

बिहार विधानपरिषदेचे सभापती देवेश चंद्र ठाकूर यांच्या हस्ते या दोघांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते. तर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे होते. यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार कपिल पाटील, माजी आमदार राम कांडगे, कृष्णराव भेगडे, जगनाथ बापू शेवाळे, सूर्यकांत काका पलांडे, संभाजीराव कुंजीर, दिलीप ढमढेरे, उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे आदी उपस्थित होते.

Alandi : कोविड काळात सामाजिक कामाचा ठसा उमटविणाऱ्या 101 कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान

Deven Chandra Thakur

यावेळी बोलताना देवेन चंद्र ठाकूर म्हणाले, बिहारमध्ये विकासाचा मुद्दाच नाही. तुम्ही पाहत असाल बिहारमधले आमदार खासदार कधीच विकासाच्या मुद्द्यावर बोलताना दिसत नाही. येथील नागरिक पाच वर्षात रस्ते नाहीत, रुग्णालय नाही, पाणी नाही म्हणून तक्रार करतील. पण, निवडणूक आल्यानंतर 99 टक्के मतदार आपल्या जातीच्या उमेदवाराला शोधत असतो. म्हणून बिहारमधील निवडणुकांचा समीकरण हे जातीवर अवलंबून आहेत. एखाद्याने कितीही काम केले तरी शेवटी जात बघूनच त्याला मत दिले जाते.

बिहारमधील सर्वात मोठा सण असलेल्या छट पूजेविषयी (Deven Chandra Thakur) देखील ठाकूर यांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, दिवाळीच्या सहाव्या दिवशी होणारी पूजा म्हणजेच छठ पूजा. दिवाळीनंतर थंडीला सुरुवात होते. त्यामुळे छट पूजेद्वारे सूर्याची उपासना केली जाते. ही पूजा फक्त महिलांची असते. या पूजेच्या दिवशी महिला नदी, तलाव, समुद्र यासारख्या ठिकाणी पाण्यात उभ्या राहून सूर्याची उपासना करत असतात. अस्ताला जाणाऱ्या आणि उगवत्या दोन्ही सूर्याची उपासना महिला करतात.

बाळासाहेब लांडगे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी कुस्ती जतन केली होती. संयुक्त महाराष्ट्रानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र कुस्ती जतन करण्यात आली. त्यावेळी एका अधिवेशनात कुस्तीगिरावर अन्याय झाला. तेव्हा मामासाहेब मोहोळ यांनी माझ्याकडे कुस्तीची जबाबदारी दिली. तेव्हापासून आजतागायत कुस्तीत काम करत आहे. महाराष्ट्रातील कुस्ती जतन करण्यासाठी मी तेव्हापासून काम करत आहे. कुस्तीसाठी जगातील वेगवेगळ्या देशात फिरत राहिलो. या सर्व घडामोडीत महाराष्ट्राचा पैलवान मागे का? हा विचार सतत येत होता. तेव्हा महाराष्ट्रात मॅट प्रशिक्षणाला सुरुवात केली. मातीतला पैलवान मॅटवर आणला. यादरम्यान अनेक संकट आली. कुस्तीत आता राजकारण आले आहे. राजकीय मंडळी यात हस्तक्षेप करत आहे. खेळापेक्षा मीच कसा मोठा? अशी भावना आता निर्माण झाली आहे.

नानासाहेब नवले म्हणाले, समाजाचे भले करणारी माणसे आणखी मोठी झाली पाहिजेत. भारतात जो कारखाना पहिला आला, तो संत तुकाराम कारखाना. तुकाराम महाराज खूप मोठे आहेत. आमच्या साखर कारखान्याबद्दल अजित पवार, शरद पवार देखील आश्चर्य व्यक्त करतात.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणाले, रामकृष्ण मोरे हे नेतृत्व करणारे नेते होते. अनेक क्षेत्रात त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले. नानासाहेब नवले हे राजकारणात असले, तरी त्यांना सांप्रदायाचा मोठा वारसा आहे. परदेशातील कुस्ती जशी भारतात आली, तशी भारतीय कुस्ती परदेशात जाण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बाळासाहेब लांडगे यांच्याकडे व्यक्त केली

माजी आमदार कपिल पाटील म्हणाले, देवेश ठाकूर दोस्तांचे दोस्त आहेत. रामकृष्ण मोरेंच्या अखेरच्या दिवसात ते कायम त्यांच्यासोबत होते. बिहारचे असले तरी महाराष्ट्रात शिक्षणासाठी ते आले आणि इथल्या मातीशी त्यांचे नाते घट्ट राहिले.

खासदार श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले, राजकारणात मी आलो ते रामकृष्ण मोरे यांच्यामुळेच. आज जो काही आहे ते रामकृष्ण मोरे यांच्यामुळेच. राजकारणात काम करत असताना कुणाचा तरी आशीर्वाद आणि कुणाचे तरी सहकार्य लागतेच. माझ्या पाठीशी रामकृष्ण मोरे यांचे आशीर्वाद होते. राजकारणातला आत्मविश्वास मी रामकृष्ण मोरे यांच्याकडून शिकला. नानासाहेब नवले यांच्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संजीवनी मिळाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संजय बालगुडे यांनी केले, तर आभार मंदार चिकने यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.