Talegaon : जमिनीच्या वादातून टोळक्याची आई-मुलाला मारहाण

एमपीसी न्यूज – जमीन नावावर करण्याच्या कारणावरून बारा जणांच्या टोळक्याने आई आणि मुलाला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मावळ तालुक्यातील कदमवाडी आंबळे येथे शनिवारी (दि. 3) रात्री सातच्या सुमारास घडली.

अनिता तानाजी कदम (वय 40, रा. कदमवाडी, आंबळे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार निलेश बाळू कदम, रवी बाळू कदम (दोघे रा. कदमवाडी, आंबळे, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिता कदम आणि आरोपी यांच्यामध्ये जमीन नावावर करण्याच्या कारणावरून मागील काही दिवसांपासून भांडण सुरु होते. शनिवारी आरोपींनी निगडी येथील आठ ते दहा मित्रांना बोलावून सर्वांनी मिळून अनिता यांच्या घराचा दरवाजा तोडून, खिडकीच्या काचा फोडल्या. सर्वजण जबरदस्तीने अनिता यांच्या घरात घुसले. आरोपी निलेश आणि रवी यांनी अनिता यांचा हात पिरगाळून त्यांच्यासह त्यांचा मुलगा प्रवीण यालाही मारहाण केली. तसेच जमीन नावावर करून दिली नाही तर ‘एकएकाला गाठून तोडीन’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.