Tallest National Flag: झंडा ऊंचा रहे हमारा! शान न इसकी जाने पाए…

How many days did the country's tallest national flag fly at a cost of crores of rupees? Pimpri-Chinchwadkar's Unanswered Questions पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारला खरा, पण हा राष्ट्रध्वज फडकला तरी किती दिवस, यासह पिंपरी-चिंचवडकरांच्या मनातील अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत. राष्ट्रध्वज म्हणजे बघायचा फक्त उंचच उंच खांब!

एमपीसी न्यूज (देवदत्त कशाळीकर) – पिंपरी-चिंचवड शहरात भारतातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने तब्ब्ल दोन कोटी 77 लाख 24 हजार 96 रुपये खर्च केले आहेत. एवढा मोठा खर्च करून शहरवासीयांना देशातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज किती वेळेला फडकताना दिसला, हा मोठा प्रश्न आहे. या कामात सुद्धा लोणी खाल्लं गेलं का, देशातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यासाठी पालिकेला बंधनकारक होतं का, असे अनेक प्रश्न पिंपरी-चिंचवडकरांना पडत आहेत. सांगायला देशातील सर्वाधिक उंचीचा झेंडा आहे, पण प्रत्यक्षात मात्र त्याचा नुसता उंचच उंच खांब दिसतोय.

1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये पावसाळा असल्यामुळे राष्ट्रध्वज न फडकवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तो एक प्रकारे बरोबर आहे. मग हा कालावधी वगळता एक ऑक्टोबर  ते  31 मे या कालावधीमध्ये निगडी येथील राष्ट्रीय ध्वज स्मारक, म्हणजेच महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभा केलेला राष्ट्रध्वज हा आपणास फडकताना पहावयास मिळायला हवा. पण वरील आठ महिन्यांच्या अखंड कालावधीत राष्ट्रध्वज क्वचितच फडकलेला दिसला.

दोन वर्षांपूर्वी महापालिकेने देशातील सर्वात जास्त उंचीचा 107 मीटर उंच राष्ट्रध्वज उभा केला. त्याचे दिमाखात अनावरण  सुद्धा झाले, आता वषर्भर शहराच्या लांबच्या कोपऱ्यातून सुद्धा राष्ट्रध्वज दिसेल अशी शहरवासीयांची आशा होती. ती आशा मात्र आता  मावळली आहे. शहरात प्रवेश करताना दिमाखदार असा अतिशय उंच राष्ट्रध्वज पाहताना अभिमानाने उर भरून येत होता, पण रेकॉर्ड करण्याच्या नादात महापालिकेला पुढे कोणत्या समस्येला सामोरे जावे लागेल, याचा विसर नेहमीप्रमाणे पडला.

श्रीमंत महापालिका म्हटल्यावर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी देशातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्याचे ठरवले.  परंतु पुढे वारा, पाऊस यामुळे राष्ट्रध्वज फडकावताना काय-काय अडचणी येऊ शकतात, याबद्दल विचार करायला कोणालाही वेळ नव्हता. यानंतर हवेचा प्रचंड दाब व ध्वजाचा मोठा आकार याचे गणित जमेना. त्याचा परिणाम म्हणजे  आजवर राष्ट्रध्वज तब्ब्ल 30 वेळा बदलला आहे.

राष्ट्रध्वज फडकत ठेवण्याच्या स्थितीत नसल्याने काढून घ्यावा लागला व वेळोवेळी बदलावा लागला. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार,आजवर या कामावर 20 लाख 21 हजार 550 रुपये महापालिकेने खर्चही केला आहे. राष्ट्रध्वजासारखी बाब असताना, वर्षभरात अनेकवेळा आपणास केवळ खांब पाहून राष्ट्रध्वज कुठंय, असा प्रश्न पडला. तर वाऱ्याचे कारण देऊन महापालिका हात वर करू शकते.

पालिकेकडून प्रत्येक कामाला सल्लागार नेमला जातो. प्रथेप्रमाणे या कामासाठी सुद्धा पालिकेकडून सल्लागार नेमण्यात आला. सल्लागाराने दिलेल्या सल्ल्यानुसार काम झाले. सल्लागाराचा सल्ला (अशा सल्ल्याला सल्ला म्हणायचा का, हा मोठा प्रश्न आहे), पालिकेचा अक्षम्य दुर्लक्ष यामुळे शहरवासीयांना आज केवळ खांब बघावा लागत आहे.

असे निकृष्ट काम बघून ‘राष्ट्रध्वज उभारणीमध्ये सुद्धा लोणी खाण्याचा प्रयत्न झाला का,’ असा प्रश्न शहरवासीयांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. ‘राष्ट्रध्वज कधीही काढायचा, कधीही फडकवायचा हा त्याचा अवमान नाही का, असाही प्रश्न आहेच.

एवढा मोठा राष्ट्रध्वज उभारण्यासाठी पालिकेचा अट्टाहास का, पालिकेला राष्ट्रध्वज उभारण्यासाठी कोणी बंधनकारक केले होते का, पिंपरी-चिंचवडकर संपूर्ण जगभरात अभिमानाने सांगतात की, भारतातील सर्वात उंच झेंडा आमच्या शहरात आहे. पण जेंव्हा तो दाखवण्याची वेळ येते, तेंव्हा तिथे केवळ खांबच उभारलेला दिसतो.

सुरुवातीला नियोजन चुकले, काही चुका झाल्या तर त्या एक ते दोन वेळेला माफही होतील. जास्तीत जास्त तिसरी चूक देखील मान्य. पण झेंडा उतरवणे आणि चढवणे हे 30 वेळेला झाले आहे. पालिकेच्या नियोजनशून्यतेमुळे शहरवासीयांनी मान का खाली घालायची?

झेंडा खाली उतरवणे, पुन्हा चढवणे यासाठी सुद्धा वेगळा खर्च सुरूच आहे. देशातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्याच्या मोठेपणाखाली केवळ उधळपट्टी सुरु आहे. नागरिकांच्या भावनांशी पालिकेला काहीही देणेघेणे नाही, असं समजायला आता काहीच हरकत नाही.

नाशिकफाटा येथील पुलाला जोडणाऱ्या छोट्या  पुलाचे फसलेले  नियोजन हा विषय नागरिकांनी कसाबसा मागे टाकला. पण राष्ट्रध्वजाबाबत नियोजन करताना उंची, हवा व झेंड्याचा आकार याचा विचार झाला असता तर कदाचित नगरवासीयांना वर्षभर तिरंगा फडकताना पाहता आला असता, अशी किमान अपेक्षा शहरवासीय करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like