Wakad : मी इथला भाई आहे मला विचारल्याशिवाय तू एस आर ए चा फॉर्म भरायचा नाही

धमकी देत तरुणावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज – तरुणाला जीवे मारण्याची धमकी देत ‘मी इथला भाई आहे मला विचारल्याशिवाय तू एसआरएचा फॉर्म भरायचा नाही’ असे म्हणत बेदम मारहाण केली. तसेच जबरदस्तीने खिशातील पैसे काढून घेतले. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकास पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 12) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास काळा खडक, वाकड (Wakad) येथे घडली.

Maval : निगडी ते पवना धरण दरम्यान पीएमपी बस सुरु करा

संदीप उर्फ बाळू शांताराम भोसले (वय 32, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड (Wakad ) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह गणेश डोंगरे (रा. गणेश नगर, थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित कुमार मदाळे (वय 23, रा. काळा खडक थेरगाव. मूळ रा. कर्नाटक) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास फिर्यादी जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना बोलावून घेत त्यांना ‘तू एसआरएचा फॉर्म भरला का? मी इथला भाई आहे, मला विचारल्याशिवाय तू एसआरएचा फॉर्म भरायचा नाही’ अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

आरोपी गणेश डोंगरे यांनी फिर्यादी यांचा गळा दाबून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी संदीप याने फिर्यादी यांच्या खिशातून चारशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ‘माझ्या नादाला लागाल तर एकेकाचा मर्डर करून टाकतो’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

फिर्यादी हे आरोपींच्या तावडीतून सुटून पळून जात असताना आरोपींनी पुन्हा अडवून शिवीगाळ करत कोयत्याने मारले. मात्र फिर्यादी यांनी कोयत्याचा वार चुकविला. जर कोयत्याचा वार फिर्यादी यांना लागला असता तर त्यांचा जीव गेला असता.

आरोपी संदीप भोसले याने ‘मी इथला भाई आहे. बाळा भोसले माझे नाव आहे. माझी दोन घरे आहेत. माझा एक पाय जेलच्या बाहेर व एक पाय जेलच्या आत असतो. एका एकाला मारून टाकीन’ अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने कोयता हवेत भिरकावत मोठमोठ्याने आरडाओरडा करत लोकांमध्ये दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.