Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसचे अचानक सुट्टीवर गेलेले 25 कर्मचारी बडतर्फ

एमपीसी न्यूज – एअर इंडिया एक्सप्रेसच्या 300 सिनियर कॅबीन क्रू कर्मचाऱ्यांनी (Air India Express) एकाच वेळी वैद्यकीय कारण सांगत सुट्टी घेतली. तसेच हे कर्मचारी मंगळवार (दि. 7) सायंकाळ पासून मोबाईल देखील बंद करून बसले. कर्मचाऱ्यांच्या अचानक एकाच वेळी रजेवर जाण्याने एअर इंडिया एक्सप्रेसच्या उड्डाणांवर मोठा परिणाम झाला आहे. देशभरातील 82 उड्डाणे यामुळे रद्द करण्याची नामुष्की कंपनीवर ओढवली. त्यामुळे सुट्टीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी 25 कर्मचाऱ्यांना कंपनीने बडतर्फ केले आहे.

 

मंगळवारी सायंकाळी सिनियर कॅबीन क्रू कर्मचाऱ्यांनी अचानक आजारपणाचे कारण सांगत रजा घेतली. टाटा समूहाच्या एअर इंडिया कंपनीसोबत एअर इंडिया एक्सप्रेस, एअर एशिया, विस्तारा या कंपन्यांचे विलीनीकरण झाले आहे. हे विलीनीकरण आणि अन्य कारणांवरून एअर इंडिया एक्सप्रेस मधील कर्मचारी नाराज आहेत.

 

ही नाराजी या रजा नाट्यावरून समोर आली आहे. याला आंदोलन म्हणता येणार नाही, मात्र कर्मचाऱ्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेस युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. मंगळवार सायंकाळ पासून डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल अशी एकूण 82 उड्डाणे रद्द झाली आहेत.

Maharashtra Police Recruitment : पोलीस भरतीसाठी एकापेक्षा जास्त अर्ज करणाऱ्यांना द्यावी लागणार लेखी हमी 

 

काही उड्डाणे रद्द झाली तर काही उड्डाणे विलंबाने झाली आहेत. उड्डाणे रद्द झालेल्या प्रवाशांना पूर्ण रिफंड अथवा इतर तारखेला तिकीट देण्यात येणार असल्याचे एअर इंडिया एक्सप्रेस कडून सांगण्यात आले आहे.

 

दरम्यान कंपनीकडून प्रवाशांची माफी मागण्यात आली. घरातून प्रवासासाठी निघण्यापूर्वी प्रवाशांनी विमान उड्डाणाबद्दल अपडेट तपासून बाहेर पडावे असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कंपनीकडून युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान कंपनीने 25 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली (Air India Express) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.