Pune : आबा तिकडे तिकीट नसेल भेटत तर इकडे या – रामदास आठवले

रामदास आठवले यांचे आबा बागुलांना आमंत्रण

एमपीसी न्यूज – कॉंग्रेसचे 5 वेळा नगरसेवक आणि माजी उपमहापौर असलेले आबा बागुल यांना केंद्रीय मंत्री आणि आर पी आय चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले आहे. आबा तिकडे तिकीट नसेल भेटत तर इकडे या , असे म्हणत रामदास आठवले यांनी आबा बागुलांना आमंत्रण दिले आहे. 
आबा बागुल यांनी आयोजित केलेल्या नवरात्री उत्सवाला रामदास आठवले यांनी भेट दिली. “मी काही वर्ष कॉंगेस सोबत होतो त्यामुळे मला आबा बागुल चांगले माहित आहेत. ते 5 वेळा कॉंग्रेसचे नगरसेवक आहेत. पण तरी देखील त्यांना कॉंग्रेसकडून तिकीट भेटत नसेल तर त्यांनी इकडे याव आम्ही त्यांना तिकीट देऊ.” असे रामदास आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, पर्वती विधानसभा मतदार संघातून आबा बागुल आमदारकी साठी इच्छुक आहेत. मात्र, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती होणार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून नगरसेविका अश्विनी कदम यांनी आपली दावेदारी भक्कम केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसशी एकनिष्ठ आणि 30 वर्षापासून नगरसेवक असलेल्या आबा बागुलांना तिकीट मिळणार का हाच मोठा प्रश्न आहे.
तब्बल 30 वर्षे एकाच पक्षातून सातत्याने नगरसेवक म्हणून समाधानकारक काम करणारे माजी उपमहापौर आबा बागुल आता येत्या 2019 मध्ये तरी आमदार होणार काय? पक्ष त्यांना न्याय देणार काय ? अन्य पक्षीय त्यांचेबाबत काय भूमिका घेतील ?जनता आमदारकीसाठी त्यांच्या पाठीशी राहील काय ? अशा सर्व प्रश्नांवर आता खल सुरु होत आहे .
मध्यंतरी आबा बागुल यांच्या संकल्पनेतून पुणे महानगरपालिकेतर्फे स्व .विलासराव देशमुख थ्री-डी तारांगणाच्या उदघाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आबा बागुल यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे , आपण माझ्यावर कायम असेच प्रेम राहू द्यावे आणि 2019 च्या निवडणुकीत मला आमदार करावे, अशी थेट मागणी केली होती. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणातून आबा यांच्या कामाचे कौतुक केले पण आबा यांच्या या मागणीबाबत चाकर शब्द देखील काढला नव्हता . हाच धागा पकडून पकडून आता रामदास आठवले यांनी आबा बागुलांना आमंत्रण दिले आहे. आता आबा बागुल आठवलेंच्या या आमंत्रणाला कस उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.