Ind vs Pak : भारतीय संघाने पाकिस्तानवर मिळवला चित्तथरारक विजय

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) : भारतीय संघाने पाकिस्तानला (Ind vs Pak) सहा गडी राखून नमवले आणि भारतीय चाहत्यांना आजच वर्ल्डकप जिंकल्याच्या सारखे समाधान वाटले म्हणूनच आज भारतात सर्वत्र फटाक्यांची जोरदार आतिषबाजी झाली.

जगभरातल्या क्रिकेट रसिकांसाठी भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन संघातल्या लढतीपेक्षा मोठी मेजवानी कुठलीही नसते. एक तर आताशा या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात पुर्वीसारखे सामने होत नाहीत, त्यामुळे खऱ्या क्रिकेटप्रेमींच्या मनात नाही म्हटले तरी एक नाराजीची भावना असतेच,अशातच हल्ली पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमधून विस्तव जात नाही, पण काही अंशी का होईना यामुळे आलेली कटुता कमी होण्याची एकमेव संधी असते ती म्हणजे या दोन संघात त्रयस्थ जागी होणारी लढत.

आज टी -20 विश्वकप स्पर्धेतली भारतीय (Ind vs Pak) संघाची पहिली लढत तीही पाकिस्तान सारख्या जिगरबाज प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध, दिवाळीच्या सुट्टीत असा सामना यावा, तो ही रविवारी, बायकोच्या असंख्य सूचना ऐकून न ऐकल्यागत करुन हा सामना बघावा आणि आंधळा मागतो एक डोळा, परमेश्वर देतो दोन डोळे अशी आंनदाला शब्दात विशद न करता येण्यासारखी परिस्थिती निर्माण व्हावी आणि दुधात साखर याचा सार्थ अर्थ सांगणारा सामना व्हावा या सुखापेक्षा मोठे जगात काहीही नाही, नाहीच नाही, बरोबर ना?

मेलबोर्नच्या ऐतिहासिक आणि जगातल्या सर्वात मोठ्या मैदानावर झालेल्या आजच्या टी-20 वर्ल्डकपमधल्या भारताच्या पहिल्या अन एकूण 16 व्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघासाठी स्वप्नवत सुरुवात झाली.

अनुभवी भुवनेश्वरसाठी अतिशय आदर्श आणि अनुकूल परिस्थिती असल्यावर त्याच्याकडुन जशी सुरुवात अपेक्षित असते तशीच त्याने करून दिली. त्याला पहिल्या षटकात बळी जरी मिळवता आला नसला तरी त्याने अप्रतिम षटक टाकून भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. पण, खरी कमाल केली ती युवा अर्षदीप सिंगने. त्याने आपल्या पहिल्याच चेंडूवर खतरनाक बाबर आजमला बाद करुन पाकिस्तानच्या गोटात एकच खळबळ उडवून दिली.

अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. याआधी प्रज्ञान ओझा आणि विजय शंकर यांनी अशी कामगिरी केली होती. पाकिस्तानच्या कर्णधाराला आपला भोपळा सुद्धा फोडता आला नाही. अन त्यानेच दुसरा सलामीवीर रिझवानलाही तंबूत परत पाठवून पाकिस्तानची अवस्था दोन बाद 15 अशी बिकट केली.

यानंतर शान मसूद आणि इफ्तीखार अहमद या जोडीने जबरदस्त प्रतिकार करत डाव सावरायला सुरुवात केली. खरेतर हीच पाकिस्तान संघाची परंपरागत खासियत आहे, ते कधीही कसल्याही परिस्थितीत डगमगत नाहीत, भारताच्या विरुद्ध तर नाहीच नाही. या जोडीनेही तशीच विजिगिशु वृत्तीचे प्रदर्शन करत तिसऱ्या गड्यासाठी 76 धावांची मौल्यवान भागीदारी करत पाकिस्तान संघाला सामन्यात वापस आणले. अर्धशतक झाल्यानंतर इफ्तीखारला मोहम्मद शमीने 51 धावांवर पायचीत करुन ही जोडी फोडली. अन यानंतर लगेचच हार्दिक पंड्यानेही आपली कमाल दाखवत शादाब खान आणि हैदर अलीला तंबूत परत पाठवून पाकिस्तानसंघाची अवस्था दोन बाद 91 वरून पाच बाद 98 अशी केली.

यावेळी भारतीय संघ वरचढ वाटत होता, पण शान मसूदने तळाच्या फलंदाजाना सोबत घेवून एकाकी लढत देत पाकिस्तान संघाला 159 धावांची सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. मसूदने 42 चेंडूत पाच चौकार मारत नाबाद 52 धावा केल्या, त्याला शाहीन आफ्रिदीनेही 8 चेंडूत 16 धावा चोपत चांगली साथ दिली. भारतीय संघाकडून पंड्याने सर्वोत्तम गोलंदाजी करत 30 धावा देत 3 तर आपल्या वर्ल्डकपमधल्या पहिल्याच सामन्यात खेळणाऱ्या अर्शदीपने 32 धावा देत 3 गडी बाद केले. भुवनेश्वर आणि मोहम्मद शमीने एकेक गडी बाद केला.

120 चेंडूत 160 धावा भारतीय संघासाठी अवघड (Ind vs Pak) नसल्यातरी पाकिस्तान गोलंदाजांसाठी त्या आव्हान जिवंत ठेवण्यासाठी कमीही नव्हत्या. त्यातच आज त्यांचा हुकुमी गोलंदाज शाहीन आफ्रिदी आक्रमणाची धुरा सांभाळत होता. त्याचे पहिले षटक तितके तिखट नसले तरी ती कसर भरुन काढली. ती नसीम शाहने. त्याने अडखळत खेळत असलेल्या राहुलच्या चिपळ्या उडवत भारतीय संघाला पहिला धक्का दिला. अन यातून सावरण्याआधीच हरिस रौफने कर्णधार रोहीतला सुद्धा केवळ चार धावांवर बाद करुन भारतीय संघाची अवस्था दोन बाद 10 अशी करुन सामना कसा होणार आणि भारतीय संघापुढे पुढे काय वाढून ठेवले आहे याचीच एक झलक दाखवली. रोहीत कर्णधार म्हणून नक्कीच यशस्वी ठरत आहे, पण फलंदाज म्हणून त्याची कामगिरी मागील बऱ्याच सामन्यात खालावलेलीच आहे.

आजही त्याचे अपयश कायम राहिले. अर्थात भारतीय संघाला अजूनही भिती वाटावी अशी परिस्थिती नव्हती. नवोदित फक्त म्हणायला असणाऱ्या सुर्यकुमार यादवने आपल्या जबरदस्त फलंदाजीने जगभरातल्या क्रिकेट रसिकांसह मोठमोठ्या आजीमाजी क्रिकेटपटूला आपले फॅन बनवले आहे. त्यामुळे तो मैदानावर असेपर्यंत भारतीय संघाला 160 धावांची काळजी वाटत नव्हतीच. त्याने आल्या आल्या आपल्या चिरपरिचित शैलीत चौकार मारून सुरुवात तरी चांगली केली होती. पण, रौफनेच सुर्यकुमार यादवला वैयक्तिक 15 धावावर बाद करून भारतीय संघाला तिसरा पण मोठा धक्का दिला.याने रोहीत सारखा चलाख कर्णधार ही गडबडला, त्याने हार्दिक पंड्याऐवजी फलंदाजीला बढती देत अक्षर पटेलला फलंदाजीसाठी पाठवून सर्वानाच आश्चर्यचकीत केले.

पण, अक्षरने आल्यापावली बाद होत कर्णधाराचा निर्णय चुकला हेच सिद्ध केले आणि भारतीय संघाची अवस्था चार बाद 31 अशी बिकट झाली. पाकिस्तानची गोलंदाजी नेहमीच घातक असते, हे मागील पन्नास वर्षात नेहमीच सिद्ध होत आलेले आहे. आजही त्याचीच प्रचिती येत होती. भारतीय संघ अडचणीत सापडला होता, अन नेहमीप्रमाणे पाकी गोलंदाज जबरदस्त मारा करत होता. अशा कठीण परिस्थितीत माजी कर्णधार आणि कदाचित भावी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा हार्दीक पंड्याही जोडी एकत्र आली. अनुभव आणि क्लास दाखवत या जोडीने आपला जम बसवला अन मग जम बसल्यावर धावा काढायला सुरुवातही केली. पण, पाकिस्तानचे गोलंदाज धावाचा आवेग रोखण्यात चांगलेच उष्ण ठरत होते, त्यामुळेच या भारतीय जोडीला वेगात धावा काढणे जमत नव्हते. आधी षटकामागे आठ मग नऊ अशी परिस्थिती असताना शेवटच्या काही षटकात तर प्रत्येक चेंडूवर किमान तीन धांवाची सरासरी अपेक्षित होती.

16व्या षटकात मात्र विराट कोहलीने आपले विराट रूप दाखवत धावा चोपायला सुरुवात केली. याचदरम्यान त्याने आपले 34वे टी -20 मधले अर्धशतक पूर्ण केले. पाकिस्तानविरुध्दची त्याची मागील सहा सामन्यातली कामगिरी विलक्षण अशी आहे. सहा सामन्यात त्याने चार अर्धशतक व एक शतक केले आहे, तर 36 ही त्याची या सामन्यातली सर्वात कमी धावसंख्या आहे. अर्धशतकानंतर तर त्याने सर्वच पाकिस्तानी गोलंदाजावर जबरदस्त हल्ला चढवला आणि भारतीय संघाला विजयाच्या बऱ्यापैकी जवळ आणले होते तरीही शेवटच्या दहा चेंडूत 29 धावा हव्या होत्या, त्यातच हार्दिक पंड्या अन भरवशाचा दिनेश कार्तिकही बाद झाल्याने सामना खूपच रोमहर्षक अवस्थेत आला होता.

अखेरच्या सहा चेंडूत 16 धावा हव्या असताना नवाजने पहिले तीन चेंडू अचूक टाकून भारतीय संघाला पराभवाचा धोका निर्माण केला होता, पण तिसऱ्या चेंडूवर विराटने विराट षटकार मारत तिसरा चेंडू नोबॉल असल्याचे पंचाच्या निदर्शनास आणून दिले, यावेळी फ्री हिट मिळाला, त्यानंतरच्या चेंडूवर विराट त्रिफळाबाद झाला, पण तो फ्री हिट असल्याने चेंडू बॅटला आणि यष्टीला लागून थर्डमॅनच्या दिशेने गेला अन चतुर विराटने अतिशय चलाखी दाखवत तीन धावा काढून पाकिस्तानच्या जखमेवर मीठच चोळले.

आता भारतीय संघाला विजयासाठी दोन चेंडूत दोन धावा हव्या होत्या, मात्र पाचव्या चेंडूवर दिनेश कार्तिक अतिशय निष्काळजीपणाने बाद झाला अन सामना पुन्हा एकदा थरारक अवस्थेत आला. एक चेंडू अन विजयासाठी दोन धावा हव्या असताना रवी अश्विनने नवाजच्या शेवटच्या चेंडूला मिडविकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर पाठवले आणि भारतीय संघाने एकच जल्लोष करायला सुरुवात केली. चार गडी राखून भारतीय संघाने हा सामना जिंकतानाच आपल्या विजयाची सुरुवातही केली आहे अन वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानवर असलेल्या वर्चस्वालाही कायम ठेवले आहे.

Ind vs Pak : पाकिस्तानचा पराभव करून भारताने देशाला दिवाळीची भेट

भारतीय संघाने वर्ल्डकप मध्ये पाकिस्तान वर 14 सामन्यात तेरावेळा विजय मिळवला आहे. तर एकदाच तेही मागच्या वर्षी दुबईत पाकिस्तानने भारतीय संघाला पराभूत केले होते. आजच्या विजयाचे शिलेदार कोहली, पंड्या आणि अर्शदीप ठरले. कोहलीनेनी आज अतिशय नेत्रदीपक फलंदाजी करताना केवळ 53 चेंडूत सहा चौकार आणि चार उत्तुंग षटकार मारत नाबाद 82 धावा करून आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर अतिशय अविस्मरणीय अशी भेट दिली आहे. त्यालाच सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. पाकिस्तान कडून रौफ आणि नवाजने प्रत्येकी दोन गडी बाद करून भारतीय संघाला परेशान केले, खरे पण ते आपल्या संघाला विजयी मात्र करु शकले नाहीत.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान 8 बाद 159

मसूद नाबाद 52,इफ्तीखार 51,शाहीन 16

अर्शदीप 32/3,पंड्या 30/3

पराभूत विरुद्ध

भारत 6 बाद 160

कोहली नाबाद 82,पंड्या  40,सुर्यकुमार 15

रौफ  36/2,नवाज 44 /2

Ind vs Pak : पाकिस्तानचा पराभव करून भारताने देशाला दिवाळीची भेट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.