Sassoon Hospital : ससून सर्वोपचार रुग्णालय येथे राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा

एमपीसी न्यूज – आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ससून सर्वोपचार (Sassoon Hospital) रुग्णालय येथे राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती दासवानी, आयुर्वेद विभागाचे विभाग प्रमुख वैद्य व्यंकट धर्माधिकारी आदी उपस्थित होते. 
आज आयुर्वेद शास्त्र अतिशय जोमाने पुढे येत असल्याचे नमूद करून आयुर्वेदिक उपचारांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. काळे यांनी केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. दासवानी म्हणाल्या, विविध औषधी वनस्पतींचा वापर आयुर्वेदाप्रमाणेच आधुनिक शास्त्रातदेखील होत आहे.
आयुर्वेद विभागप्रमुख वैद्य धर्माधिकारी म्हणाले, ससून (Sassoon Hospital) रुग्णालयात अनेक दुर्धर व्याधींवर आयुर्वेदीय विभागातर्फे उपचार करण्यात येतात. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असणाऱ्या आयुर्वेद विभागाकडून रुग्णांना पंचकर्म व आयुर्वेदीय औषधी चिकित्सा देण्यात येते.
या वर्षी आयुष मंत्रालयाच्या ‘प्रत्येक दिवस प्रत्येक घरी आयुर्वेद’ या संकल्पनेअंतर्गत ससून रुग्णालयातील आयुर्वेद विभागातर्फे विविध माहितीपर सत्राचे आयोजन गेल्या आठवड्यात करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने आयुर्वेद विभागातर्फे केल्या जाणाऱ्या कार्याचे सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.