Nigdi : ‘हरे कृष्णा, हरे रामा’च्या नामघोषात निघाली इस्कॉनची श्री जगन्नाथ रथयात्रा

एमपीसी न्यूज- ‘हरे कृष्णा, हरे रामा’च्या नामघोषात गुरुवारी (दि. 30) इस्कॉनच्या वतीने श्री जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी रांगोळी काढून या रथयात्रेच्या पिंपरी-चिंचवडकरांनी स्वागत केले. यात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

श्री जगन्नाथ रथयात्रेला दत्तमंदिर यमुनानगर येथुन सुरुवात झाली. आमदार लक्ष्मण जगताप आणि स्थानिक नगरसेवक तसेच इस्कॉनचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जगन्नाथांची आरती करण्यात आली. त्यानंतर आलेल्या भाविकांनी रथ ओढत रथयात्रेला सुरुवात केली. यावेळी रथयात्रेच्या मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. ही रथयात्रा यमुनानगर दत्तमंदिरापासून निगडीतील मधुकर पवळे पूल, महाराष्ट्र बँक, आकुर्डी, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, म्हाळसाकांत चौक, संभाजी चौक, बिजलीनगर पूल, आकुर्डी रेल्वे स्टेशन या मार्गाने जात इस्कॉन श्री गोविंद धाम मंदिर येथे समाप्त झाली

जगन्नाथपुरी येथून ज्याप्रमाणे रथयात्रा काढली जाते, त्याप्रमाणेच रावेत श्रीगोविंद धाम इस्कॉन मंदिराच्या वतीने शहरात रथयात्रा काढली जाते. प्रत्येक भाविकाला मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणे शक्य नसते. त्यामुळे या रथयात्रेच्या माध्यमातून प्रत्येकाला भगवंताचे दर्शन व्हावे, या उद्देशाने या रथयात्रेचे आयोजन केले जाते. हे रथयात्रेचे यंदाचे 20 वे वर्ष आहे. यामध्ये हजारो भाविक सहभागी होऊन भगवंतांच्या दर्शनाचा लाभ घेतात.

या महोत्सवाच्या अंतर्गत रावेत श्रीगोविंद धाम इस्कॉन मंदिरात सकाळी 8 वाजता मंगल होम यज्ञ, त्यानंतर सायंकाळी भजन, सायंकाळी सात वाजता नाटिका, सायंकाळी साडेसात वाजता जगन्नाथ कथा, रात्री साडेआठ वाजता विशेष दर्शन आणि आरती, रात्री 9 वाजता महाप्रसादाचे वाटप केले.रथयात्रेनंतर श्रीगोविंद धाम इस्कॉन मंदिरामध्ये हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.