Pimpri : पीडित कुटुंबीयांना भेटण्यास पालकमंत्र्यांना वेळ नाही हे लांच्छनास्पद – सचिन साठे 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहारातील कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. त्याकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष असून शहरातील विकास कामांची उद्‌घाटने करुन श्रेय लाटण्यासाठी वेळोवेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट शहरात येतात. परंतू कासारसाई हिंजवडी, पिंपरी आणि चिंचवड येथील पीडित कुटूंबीयांना भेटण्यास पालकमंत्र्यांना देखील वेळ नाही हे लांच्छनास्पद असल्याची टीका, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे. तसेच या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळणा-या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात साठे यांनी म्हटले आहे की, मागील चार वर्षात राज्यात महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि एकूणच गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. 15 ऑगस्टला पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडचे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. तरीही, शहरातील गुन्हेगारांवर अद्यापही जरब बसलेली नाही. गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे.

शहरातील गुन्हेगारी, खून, बलात्कार, बेकायदेशीर धंदे, पार्किंगमधील वाहने तोडफोड व जाळण्याच्या घटना, सार्वजनिक ठिकाणी महिला व मुलींची छेडछाड, सोनसाखळी चोरी व मोबाईल चोरीच्या घटनांवर अद्यापही पोलिसांना नियंत्रण मिळविता आले नाही. मागील पंधरा दिवसात पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरात अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि खुनाच्या घडलेल्या घटनांनी शहर हादरुन गेले आहे. वाढत्या घटनांमुळे शहरातील नागरिक प्रचंड तणावाखाली वावरत आहेत.

पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु करण्याचा हेतू साध्य झाला नसल्याचे यातून दिसते. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये, तसेच कायद्याची कडक अंमलबजावणी करावी अशीही मागणी साठे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.