Lonavala : खालापूर टोलनाक्याजवळ मोटारीला भीषण अपघात; पुण्यातील पाच जण जखमी

एमपीसी न्यूज : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास महिंद्रा एक्सयूव्ही  मोटारीला झालेल्या भीषण अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून सर्वांवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली मोटार क्र. ( MH 14 EY 9489) ही भरधाव जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्ता दुभाजकाच्या मधील गार्डन काॅरिडोर मध्ये पलटी झाली. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये गाडीचा चक्काचूर झाला आहे.

अपघातात असीफ कदीर शेख (वय 30), जैद अन्सारी (वय 35), मुस्तफा शेख (30), शाबाज शेख (35), जहिर खान (30, सर्व र‍ाहणार कोंढवा, पुणे) हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळावर मदत पथक पोहोचले व खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जखमींना गाडीतून बाहेर काढत उपचाराकरिता रवाना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.