KOregaon Bhime : कामगारांच्या न्यायहक्कासाठी कामगारांच्या पाठीशी मोठी ताकद उभी करणार- शरद पवार

एमपीसी न्यूज- कामगारांवरील अन्याय आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, सरकारचे शेतकरी आणि कामगार विरोधी धोरण यासाठी कामगारांनी एकत्र येण्याची गरज आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी केंद्रात आवाज उठवून कामगारांच्या मागे मोठी ताकद उभी करणार असल्याचे आश्वासन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिले. राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने कोरेगाव भीमा येथे आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार अशोकबापू पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले, कार्याध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, उपाध्यक्ष राजुअण्णा दरेकर, दत्ता येळवंडे, सणसवाडीचे सरपंच रमेश सातपुते, गणेश जाधव, अविनाश वाडेकर, राकेश चौधरी, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांबरोबरच कामगारांवर फार वाईट दिवस आणले आहेत. कामगारांची एकजूट नसल्यामुळे कामगारांचे अनेक कायद्याचे अस्तित्वच शिल्लक राहिले नाही. कामगारांचा अधिकार आणि सन्मान टिकविण्यासाठी कामगार संघटनानॆ एकत्र येण्याची गरज आहे. या साठी भविष्यात मोठे आंदोलन उभे करण्याची गरज आहे. यापुढील काळात राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ आणि कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून कामगारांचे प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले.

किशोर ढोकले म्हणाले की, कामगारांच्या नोकऱ्या असुरक्षित असून त्यामुळे बेकारी वाढत चालली आहे. भविष्यात बेकारी वाढून त्यामधून गुन्हेगारी वाढेल अशी चिंता व्यक्त करीत कामगारांवर देखील आत्महत्या करण्याची वेळ येतील अशी भीती व्यक्त केली. न्यायालयीन प्रक्रियेला विलंब लागत असल्याने व्यवस्थापनाकडून कामगारांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. कामगारांचे खटले फास्ट ट्रॅक पद्धतीने चालविले जावेत अशी मागणी केली. निवडणुकीच्या काळात कामगारांनी एकत्र आले पाहिजे असले ढोकले म्हणाले.

शिवाजीराव खटकाळे म्हणाले की, कामगारांच्या हक्कासाठी सक्षम कायदे करण्याची आवश्यकता आहे. समान काम समान वेतन कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. प्रविडेंड फंड, मेडिक्लेम न देणाऱ्या कंपनी मालकावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी खटकाळे यांनी केली.
यावेळी दत्ता येळवंडे, राजूअण्णा दरेकर याचीही भाषणे झाली.
या मेळाव्याला नगर रास्ता, चाकण परिसरातील १५० संलग्न संघटनांचे पदाधिकारी आणि सुमारे ५ हजार कामगार उपस्थित होते. प्रास्ताविक सणसवाडीचे सरपंच रमेश सातपुते यांनी केले. स्वागत राजूअण्णा दरेकर यांनी तर आभार अविनाश वाडेकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.