_MPC_DIR_MPU_III

Lockdown Diary: तुमच्या अंगी असलेल्या कलेचा आस्वाद घ्या, सराव करा, साधना करा – नृत्यांगणा पायल गोखले

Lockdown Diary: Enjoy the art you have, practice, do sadhana - Dancer Payal Gokhale

एमपीसी न्यूज – कोरोना हा शब्द ऐकला तरी सर्वांच्या भुवया उंचावतात. आता पुढे काय? असा प्रश्न सगळ्यानाच पडतोय. प्रत्येक स्तरातील, वयातील, व्यावसायिक किंवा नोकरदार, प्रत्येक माणूस या महामारीमध्ये पिचताना दिसतोय. दोन महिने बंद असलेली काम आता हळूहळू सुरु झालेली आहेत. या लॉकडाऊनकडे संधी म्हणून बघितलं पाहिजे, असं मला मनापासून वाटतं… सांगत आहेत, पायल नृत्यालयच्या संचालिका व नामवंत नृत्यांगणा पायल गोखले!

_MPC_DIR_MPU_IV

मी एक कथक नृत्यांगणा आहे. या लॉकडाऊनच्या काळात देखील माझ्यातील कलेने मला शांत बसू दिलं नाही. कला कलाकाराला नेहमी अभिव्यक्त करत असते आणि त्याच्या भावनांना प्रवहित करत असते. ही या कलेची महानता आहे. म्हणूनच लॉकडाऊन असला तरी अनेक नर्तकानी सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या कलेमार्फत स्वतःला नृत्यातून व्यक्त केलं.

अनेक online कार्यक्रम, मुलाखती, स्पर्धा, महोत्सव सादर झाले. ज्यामुळे मनाला आलेली मरगळ, हतबलता नक्कीच कमी झाली. असे असले तरी नर्तकांचे उदरनिर्वाहचे साधन म्हणजे क्लास आणि कार्यक्रम! त्यामुळे क्लास आणि कार्यक्रम कधी सुरु होणार, असा प्रश्न नर्तकांना भेडसावत आहे.

येत्या काळात कार्यक्रम आणि नृत्य स्पर्धा डिजिटल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक होतील, याचे प्रमुख कारण म्हणजे social distancing कारण कार्यक्रम किंवा स्पर्धा म्हणलं की गर्दी आलीच! स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी एकत्र येणं टाळलं पाहिजे. आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे कार्यक्रमासाठी लागणारे आर्थिक नियोजन.

या लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवसाय ठप्प झालेत, अनेक बेरोजगार झालेत, सर्वजण बिघडलेली आर्थिक घडी सावरण्याच्या मागे असताना, कार्यक्रमासाठी प्रायोजक मिळणं खूप कठीण होणार आहे. कलेकडे प्रेक्षक हौस म्हणून बघतो, ती त्याची प्रमुख गरज नाही. त्यामुळे  अर्थातच प्रेक्षक तिकिट काढून कार्यक्रमाला येण्याची शक्यता फारच कमी आहे. प्रायोजक आणि तिकिट विक्री यातून जमा होणारी रक्कम जर नसेल तर कार्यक्रम आयोजित करणार कसे?

नृत्याचे क्लास हे नर्तकांसाठी उदरनिर्वाहचे प्रमुख साधन आहे. या नृत्याचे ऑनलाइन क्लास आता सुरु झालेले आहेत. वेगवेगळ्या अ‍ॅपच्या माध्यमातून हे क्लास घेतले जात आहेत. त्यामुळे घरी राहुन नृत्य शिकता आणि शिकवता येत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा मुद्दा इथे पूर्णत: पाळला जात आहे. ऑनलाइन क्लासमुळे मुलांचा ये-जा करण्याचा वेळ आणि ऊर्जा वाचत आहे, ज्याचा नृत्याच्या सरावासाठी उपयोग करता येत आहे.

या ऑनलाइन क्लासमुळे मुलांची आकलन शक्ती खूप वाढलेली आहे. या क्लासमध्ये शिष्याला बघत बघत, ऐकत ऐकत स्वतःच शिकावे लागत आहे आणि तोंडी सूचनांवर चूक सुधारायची आहे, यामुळे शिष्य अधिक लक्षपूर्वक ऐकत आहेत, शिकत आहे. ऑनलाईन क्लासचे फायदे असले तरी असे क्लास कायमस्वरुपी घेणं सोयीस्कर नाही, हेही तितकंच खरं!

कारण, एकतर सर्व शिष्यांकडे ऑनलाइन क्लाससाठी लागणारी सोय हवी, नेटवर्क, डाटा, लॅपटॉप किंवा किमान स्मार्ट तरी फोन हवा. सध्या आई-वडील सुद्धा घरुन काम करत असल्याने क्लासच्या वेळेत फोन किंवा लॅपटॉप उपलब्ध होईलच, असं नाही. जरी हे ऑनलाइन क्लास चे तांत्रिक प्रश्न सुटले तरी कला शिकताना गुरूचा सहवास, अस्तित्व, गुरूच प्रत्यक्षात  समोर असणं खूप गरजेचं असतं.

नृत्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर नृत्यात लय खूप महत्वाची आहे. ऑनलाइन क्लासमध्ये ही लयच एकमेकना बांधून ठेऊ शकत नाही. नेटवर्क प्रॉब्लम मुळे timelap येतो ज्यामुळे लय आणि मात्रा पुढे- मागे होतात. गुरुची पढंत आणि शिष्याचे नृत्य एका लयीत होत नाही.

_MPC_DIR_MPU_II

20 शिष्यांच्या एकत्र ऑनलाइन क्लासमध्ये सगळेजण वेगवेगळया लयीत नृत्य करतात, ज्यामुळे प्रत्येकाचे चूक- बरोबर कळणे फार कठीण जाते. म्हणूनच ऑनलाइन क्लासमध्ये परिपूर्णतने शिकणे आणि शिकवणे याच्याशी तडजोड केली जाते. एकट्या शिष्याचा ऑनलाइन क्लास घेणं  सोईस्कर आहे, कारण इथे गुरु शिष्य दोघंच एकमेकांशी संवाद साधत असतात. गुरुला एकाच शिष्यावर लक्षकेंद्रीत करुन उत्तम शिकवता येते.

ऑनलाइन क्लासमधील त्रुटी दूर करण्यासाठी मी ऑनलाइन क्लासला एक पर्याय शोधला. जो मी माझ्या क्लाससाठी वापरत आहे. तो म्हणजे, गुरुने जे शिकवायचे आहे ते शिकवत असल्याचा स्वतःचा व्हिडियो काढून शिष्यांना पाठवणे, शिष्यांनी आपापल्या वेळेनुसार शिकून, सराव करुन ठरलेल्या वेळी स्वतःच वीडियो गुरुंना पाठवणे. गुरूचे जसे क्लासमध्ये प्रत्येक शिष्यावर लक्ष असते, तसे एकेका व्हिडियोवर लक्ष देऊन सुधारणा सांगता येतील.

ज्यामुळे परिपूर्णतेशी तडजोड होण्याची शक्यता कमी होईल. तसेच ऑनलाइन क्लासमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी पण बऱ्याच प्रमाणात कमी होतील. आताच्या काळात ऑनलाइन क्लास हा उत्तम पर्याय आहे परंतु कायमस्वरुपी हे क्लास हितकारक नाहीत.

लॉकडाऊननंतर पुन्हा आधीसारखे क्लास सुरु होतील तेव्हा काही कळजी घेणे गरजेचेच आहे. सुरुवातीला आठवड्यातून एकदाच क्लास मध्ये येऊन क्लास घेणे व इतर दिवशी ऑनलाइन क्लास चालू ठेवणे जेणेकरुन एकत्र येणे काही प्रमाणात कमी होईल. क्लासमध्ये मास्क आणि हातमोजे यांचा वापर अनिर्वाय ठेवणे, येता-जाता सॅनिटायजरचा वापर करणे बंधनकारक ठेवले पाहिजे. प्रत्येक क्लासनंतर क्लास निर्जन्तुक केला पाहिजे. एका बॅचमध्ये जास्त विद्यार्थिनी असतील तर क्लास वेगवेगळया वेळी विभागून घेतला पाहिजे. एखाद्याला सर्दी, खोकला, ताप, यांसारखी लक्षणे असतील तर त्याला प्रवेश निषिध्द करणे सर्वांच्या हिताचे आहे.

कोरोनच्या या परिस्थितीवर मात करतच आपल्याला पुढे जायचे आहे. ही परिस्थिती लवकरच सुधारेल, हेही तितकंच खरं!

शेवटी एवढंच म्हणेन की, या अवघड काळात तुमच्या अंगी असलेल्या कलेचा आस्वाद घ्या, सराव करा, साधना करा. या कलेमुळेच आलेला ताण, कंटाळा, नकारात्मकता सर्व दूर होईल आणि एक सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळेल.

– पायल गोखले, कथक नृत्यांगणा व संचलिका, पायल नृत्यालय

(संकलन – अमर मणेरीकर)

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.