Lonavala : नदीपात्र खोलीकरण आणि रुंदीकरणामुळे टळला पुराचा धोका

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीचे उगमस्थान असलेल्या लोणावळ्यातील टाटा धरणाच्या भिंतीपासून बाजार भागापर्यत मावळ प्रबोधनीने जानेवारी ते मार्च दरम्यान नदीपात्र स्वच्छता, खोलीकरण आणि रुंदीकरण मोहिम राबविल्याने आज लोणावळ्यातील पुराचे विघ्न टळले.

पावसाचा जोर वाढल्याने रविवारी पहाटेपासून टाटा धरणातील पाणी नदीत येण्यास सुरुवात झाली. यापुर्वी ज्या ज्यावेळी धरणातून नदीपात्रात पाणी आले तेव्हा हुडको वसाहत आणि इंद्रायणीनगर भागात पुराचे पाणी घुसले. यावेळी मात्र दिवसभर धरणातील पाणी नदीपात्रात येऊन देखिल नदीचे पाणी वसाहतींमध्ये शिरले नाही. यामुळे लोणावळ्यातील पुराचे विघ्न तुर्तास टळले आहे.

  • मावळ प्रबोधनीचे संस्थापक रविंद्र भेगडे यांच्या संकल्पनेतून जानेवारी महिन्यात मावळ प्रबोधनी, लोणावळा नगरपरिषद व मावळ वार्ता फाउंडेशन यांनी इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढत पात्रातील दगड फोडत नदीपात्राचे खोलीकरण केले तसेच रुंदीकरण करत काही भागाला दगडी पिचिंग केले. मार्चनंतर नदीत पुन्हा जलपर्णी झाली खरी मात्र जोरदार पाऊस व धरणातील पाणी येऊन देखील पात्र रुंद व खोल झाल्याने नदीचे पाणी परिसरात पसरले नाही.

नदीपात्र खोलीकरणाची व दगडी पिचिंगची मोहिम सध्या काम झालेल्या ठिकाणापासून पुढील भागात देखील राबवली गेल्यास शहरात नैसर्गिक आपत्ती आली तरी कोठेही पुराचा धोका निर्माण होणार नाही, यावर आता विचार व कृती करण्याची वेळ आली आहे.

  • नगरपरिषद कर्मचारी 24 तास तैनात
    भर पावसात नगरपरिषदेचे कर्मचारी नदीपात्रात आडकलेली जलपर्णी बाहेर काढण्याचे काम करत आहेत. तसेच शहरात कोठेही पाणी साचल्याची अथवा नाले गटारे तुंबल्याची घटना घडल्यास तात्काळ त्याठिकाणी पोहचत मदतकार्य करत आहेत. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील हे स्वतः शहरात गस्त घालत नागरिकांना तात्काळ मदत करण्याकरिता तैनात असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.