Lonavala : वलवण गोविंदा पथकाने फोडली लोणावळ्यातील मानाची हंडी

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरातील मानाची पहिली हंडी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वलवण गोविंदा पथकाने सहा थर रचत फोडली. लोणावळा शहरातील या दहीहंडी महोत्सवात यंदा मुंबई येथील 38 व लोणावळा शहर परिसरातील 12 संघांनी सहभाग घेतला होता. दहीहंडी फोडण्याकरिता फायनल राऊंडमध्ये नऊ संघ होते. यापैकी चवथ्या क्रमांकावर असलेल्या वलवण पथकाने सहा थर लावत हंडी फोडली. यावर्षी दहीहंडी सोबत प्रथमच पारंपरिक खेळाला चालना मिळावी याकरिता ढोल लेझीम खेळाच्या सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाच पथकांनी सहभाग नोंदविला होता.

मावळ वार्ता फाऊंडेशन, लोणावळा शहर पत्रकार संघ, राजकीय पक्ष व विविध संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात मागील तेरा वर्षापासून या मानाच्या हंडीचे आयोजन करण्यात येते. लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगर‍ाध्यक्ष श्रीधर पुजारी, मावळ वार्ता फाऊंडेशनचे अध्यक्ष नवीन भुरट, महोत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र चौहान, स्वामी समर्थ प्रमोटर्सचे किरण गायकवाड, रमेश पाळेकर, प्रमोद गायकवाड यांच्यासह विविध म‍न्यवरांच्या हस्ते हंडीचे पूजन करत दहीहंडी सोहळ्याला दुपारी सुरुवात करण्यात आली.

शहरातील या हंडीला सलामी देण्याकरिता मुंबई, ठाणे, कल्याण, डोबिंवली भागातील 38 संघ आले होते. त्यासह स्थानिक 12 संघांनी या सोहळ्यात रंगत आणली. ढोलताशे पथकांचे सादरीकरण पाहण्याकरिता नागरिकांनी चौकात मोठी गर्दी केली होती. अतिशय शिस्तबध्दपणे व शांततेमध्ये हा सोहळा पार पडला. मावळचे खासदार श्रीरंग ब‍ारणे, राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी सोहळ्याला भेट देत गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री टिना गोविंदा आहुजा हिने देखील गोविंदाना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.