Pimpri : टपरी, हॉकर्समध्ये ‘माफिया’राज; सर्वपक्षीय नगरसेवकांचा आरोप 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पदपथ टप-या, हॉकर्सवाल्यांनी गिळंकृत केले आहेत. त्यामुळे नागरिकांना चालणे देखील मुश्कील झाले आहे. तसेच वाहतूक कोंडीला देखील सामोरे जावे लागते. अतिक्रमण विभागाचे अधिकारी कारवाई केल्याचे केवळ नाटक करतात. टपरी, हॉकर्सच्या माध्यमातून अनेकांना हप्ते मिळत असून यामध्ये ‘माफिया’राज असल्याचा, आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत केला. तसेच हॉकर्स वाल्यांचे सर्वेक्षण लवकर पूर्ण करण्याची मागणी देखील करण्यात आली. 

 

ऑगस्ट महिन्याची तहकूब सर्वसाधारण सभा आज (गुरुवारी) झाली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांनी शहरातील फेरीवाल्यांसंदर्भात महासभेत प्रश्न विचारले होते. त्यावर नगरसेवकांनी दोन ते तास चर्चा केली.

 

कोण काय म्हणाले!

 

मीनल यादव (शिवसेना) – एकीकडे आपण स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. तर, दुसरीकडे शहरात अनधिकृत टप-यांचे पेव फुटले आहे. चिंचवड स्टेशन चौकात मोठ्या प्रमाणात अनधिकृत टप-या थाटल्या आहेत. यावर कारवाई करायला सांगून देखील अतिक्रमण विभागाचे अधिकारी कारवाई करत नाहीत. एखादी टपरी काढल्याचे केवळ नाटक केले जाते. अतिक्रमण विभागाच्या अधिका-यांना केवळ बसून पैसे खायला ठेवले आहे काय? प्रशासन झोपा काढण्याचे काम करत आहे.

 

सुजाता पालांडे (भाजप) – संत तुकारामनगरमध्ये टप-यांवर कारवाई केली जात नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत टप-या आहेत. फेरीवाले उठविले जात नाहीत. संत तुकारामनगर टप-यांचे आगार बनले असून संत तुकारामनगरचे नाव बदलून टपरीनगर करावे. पालिकेने त्वरित हॉकर्स झोनची निर्मिती करणे गरजेचे आहे.

 

जावेद शेख (राष्ट्रवादी काँग्रेस)- शहरात सर्वत्र अनधिकृत टप-या थाटल्या जात आहेत. आकुर्डीत देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रम झाले आहे. यामध्ये भाईगिरी वाढली आहे. त्यांच्याकडून अतिक्रमण विभागाच्या अधिका-यांना दम दिला जातो. आयुक्तांनी अतिक्रमण विभागाला अधिकचे मनुष्यबळ देणे गरजेचे आहे. अतिक्रमण विभागाने दोन शिफ्टमध्ये कारवाई करावी.

 

बाबू नायर (भाजप)- हातगाडी, टपरी धारकांना कोणाचीही भिती राहिली नाही. पालिकेने आजपर्यंत कोणतेही धोरण केले नाही. त्यामुळे हा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यावर सभागृहात वारंवार चर्चा होते. पंरतु, प्रत्यक्षात निर्णय कोणताच होत नाही. पदपाथ मोकळे राहिले पाहिजेत, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाने ठामपणे किती दिवसात धोरण आणले जाईल, हे सांगावे.

 

केशव घोळवे (भाजप) – टपरी, हातगाडीचा प्रश्न शहरात भेडसावत असून यामध्ये माफिया बनले आहेत.
झामाबाई बारणे, निता पाडाळे, माई ढोरे, हर्षल ढोरे यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.