Nigdi: चार वर्षाचा हिशोब मागणा-यांनी 15 वर्षात काय केले – महेश लांडगे

निवडणूक येऊ द्या, कुंडल्या काढतो

एमपीसी न्यूज – गेल्या चार वर्षात मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांबाबात विधानसभेत वेळोवेळी आवाज उठविला. अनेक प्रश्न मार्गी लावले. पण 15 वर्षात काहीच काम न केलेले लोक मला गेल्या चार वर्षातील कामाचा हिशोब मागत आहेत. निवडणूक जवळ येऊ द्या. माझ्याकडे संपूर्ण माहिती आहे. मी त्यांची कुंडली काढतो, असे सडेतोड उत्तर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी टीकारांना दिले.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने निगडी, प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर आज (शनिवारी) ‘अटल संकल्प महासंमेलन’ पार पडले. या संमेलनात बोलताना महेश लांडगे म्हणाले, कुस्तीच्या आखाड्यात शिरलो तर कोणाच्या बापाला घाबरणार नाही. महापालिका निवडणुकीवेळी शिवसेनेला युती करा असे सांगत होतो. समविचारी पक्ष एकत्र काम करु अशी विनंती आम्ही करत होते. युती झाली असती तर दोन चार नगरसेवक निवडून आले असते. परंतु, त्यांनी ऐकले नाही. भोसरीतून शिवसेनाचा एकही नगरसेवक निवडून येऊ दिला नाही.

लक्ष्मण जगताप आणि मी भाजपात तात्पुरते आहोत असे? वातावरण निर्माण केले जात आहे. आमचे चांगले चालले आहे. परंतु, आमच्या मनात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 15 वर्षात काहीच काम न केलेले लोक मला गेल्या चार वर्षातील कामाचा हिशोब मागत आहेत. निवडणूक जवळ येऊ द्या सगळ्यांना दाखवितो. माझ्याकडे संपूर्ण माहिती आहे. मी त्यांची कुंडली घेऊन बसलो आहे. फक्त निवडणूक जाहीर होण्याची वाट पाहत आहे. राजकारणाची दिशा बदलली आहे , जो काम करतो तोच राजकारणात टिकाव धरू शकतो असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीवेळी वरिष्ठ नेत्यांनी आमच्या विश्वास दाखविला. महापालिकेत भाजपची सत्ता आणली. आता पुन्हा एखदा विश्वास दाखवा मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघ खेचून आणू, असे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.