चित्रपट “ मी शिवाजी पार्क…. वेगळा अनुभव, वेगळी अनुभूती

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- मुंबई शहर, एक मायानगरी, सतत काही ना काही घटना ह्या गतिमान शहरात घडत असतात, या शहरात प्रेक्षणीय स्थळे खूप आहेत त्यातील एक “ शिवाजी पार्क “, हा शिवाजी पार्क मुंबईत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा साक्षीदार आहे. शिवाजी पार्क मध्ये ज्येष्ठ नागरिक जमण्याचा एक कट्टा आहे, ह्या कट्ट्यावर जवळचे, दूरचे राहणारे ज्येष्ठ नागरिक एकत्र येतात आणि आपली सुखदु:खे एकमेकात वाटतात, अश्या ह्या संवादामधून “ मी शिवाजी पार्क “ ची कथा सुरु होते.

गौरी पिक्चर्स प्रोडक्शन, आणि महेश मांजरेकर मुव्हीज या चित्रपट संस्थेने “ मी शिवाजी पार्क “ ची निर्मिती केली असून कथा – पटकथा – दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे आहे. निर्माते दिलीपदादा साहेबराव यादव, सिद्धार्थ केवलचंद जैन, सहनिर्माते मंगेश रामचंद्र जगताप, शंकर रामेश्वर मिटवारी, मिलिंद सीताराम वस्ते, हे आहेत. गीते वैभव जोशी, श्रीरंग गोडबोले, यांची असून संगीत अजित परब यांनी दिले आहे. संवाद अभिराम भडकमकर, छायाचित्रण करण रावत, संकलन सर्वेश परब यांनी केल आहे. यामध्ये विक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, शिवाजी साटम, दीप्ती लेले, राया अभ्यंकर, अभिजित साटम, मधुरा वेलणकर, शरद पोंक्षे, सविता मालपेकर, अजित परब, सुहास जोशी, संतोष जुवेकर, उदय टिकेकर, असे अनेक कलाकारांनी भूमिका रंगवल्या आहेत.

न्यायाधीश विक्रम राजाध्यक्ष, सतीश जोशी, इन्स्पेक्टर दिगंबर सावंत, प्रोफेसर दिलीप प्रधान, रुस्तम मेस्त्री, हे ज्येष्ठ नागरिक आपापल्या सेवेतून निवृत्त झालेले, प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगवेगळे असले तरी पण मनाने मात्र एकत्र आलेली अशी त्यांची अतूट मैत्री, ह्या पांचही जणांना सकाळी शिवाजी पार्कवर गप्पा मारल्या शिवाय, तेथे व्यायाम केल्या शिवाय आणि चहा बरोबर पेपर वाचल्या शिवाय चैन पडत नसते. अश्याच एका सकाळी सतीश जोशी सोडून सारेजण एकत्र गप्पा मारत असतांना चहा घेत पेपर वाचताना त्यांना “ ऐश्वर्या नायर हिची निर्घुण हत्या – बलवा शेट चा हात असल्याचा प्राथमिक अंदाज “ अशी बातमी वाचायला मिळते, त्यावर विक्रम राजाध्यक्ष सांगतात कि, “ बलवा शेट ला शिक्षा होणार नाही तो सुटणार,” ह्यावर चर्चा रंगते, आणि मग ते सतीश जोशी यांच्या तब्बेतीची विचारपूस करायला ते त्यांच्या घरी जातात आणि तेथे त्यांना कळते कि ऐश्वर्या नायर हि सतीश जोशी यांची नात होती.

सतीशला ते धीर देतात, शेवटी असे निदर्शनास येते की ऐश्वर्या नायर हिचा खून झाला. आणि हा खून कोणी केला ? बलवा शेट ह्यांच्यावर संशयाची सुई फिरते आणि ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायला विक्रम राजाध्यक्ष, दिगंबर सावंत, सतीश जोशी आणि रुस्तम मेस्त्री हे निघतात, अन्याय होत असतांना नुसते बघत रहाणे हा सुद्धा गुन्हाच आहे असे म्हणून ते चौघे निघतात. पुढे नाट्यमय घटनांची मालिका सुरु होते,, बलवा शेट चा अकस्मात मृत्यू होतो, दिलीप प्रधान म्हणतात कि बलवा शेट च्या हत्ये मधील माणसे मला माहित आहेत, आणि कथानकात उत्कंठा वाढत जाते. त्याचवेळी हर्षद वेदांत ची आणखी एक घटना सामोरी येते. कोण असतो हर्षद वेदांत ? ह्या सगळ्या घटनांचा शोध घेण्यासाठी एसीपी सुमित गवळी यांची नियुक्ती केली जाते ,, दहा दिवसात गुन्हेगाराला शोधून काढतो असे सांगून ते कामाला सुरवात करतात.

शेवटी काय होते ? ह्या सगळ्यात सर्वसामान्य माणसाचे काय होते ? असे का घडते ? बलवा शेट आणि हर्षद वेदांत यांचा खून कोणी केला ? त्यांना शिक्षा होते का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे सिनेमात मिळतील. सिनेमाची कथा – पटकथा – दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी उत्तमपणे साकारले आहे. चित्रपटात उत्कंठा – गती कशी ठेवता येईल याकडे बारकाईने लक्ष दिले आहे. संकलन सर्वेश परब यांचे आहे.

विक्रम गोखले यांचा न्यायाधीश विक्रम राजाध्यक्ष, सतीश आळेकर यांचा सतीश जोशी, अशोक सराफ यांचा इन्स्पेक्टर दिगंबर सावंत, दिलीप प्रभावळकर यांचा प्रोफेसर दिलीप प्रधान, शिवाजी साटम यांचा रुस्तम मेस्त्री, या सर्वांच्या अभिनयाची जुगलबंदी लक्षांत राहते. सोबत सुहास जोशी, शरद पोंक्षे, दीप्ती लेले, सविता मालपेकर, अभिजित साटम, मधुरा वेलणकर, संतोष जुवेकर, अश्या अनेक कलावंताची साथ लाभली आहे.

वास्तवावर भाष्य करणारा प्रामाणिक चित्रपट आहे. अनुभव घेऊन पहा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.