Chakan : विद्यार्थ्यांकडून शिक्षकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – शिक्षक त्रास देत असल्याचा जाब विचारत विद्यार्थ्यांनी शिक्षकाला रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली. ही घटना मेदनकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर बुधवारी (दि. 24) सकाळी आठच्या सुमारास घडली.

हर्षल प्रमोदराव राहाटे (वय 27, रा. धर्मेंद्रनगर, मोशी) यांनी याप्रकणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनिकेत संभाजी शिंदे आणि त्याचे तीन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल राहाटे चाकण मोशी मधील एका महाविद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी करतात. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ते महाविद्यालयात जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. मेदनकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर आले असता चौघांनी मिळून त्यांना अडविले. त्यामध्ये त्यांचा विद्यार्थी अनिकेत शिंदे हा देखील होता. त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी हर्षल यांना ‘तुम्ही अनिकेतला का त्रास देता’ अशी विचारणा केली. त्यावर तुम्ही कोण आहात, असे हर्षल यांनी विचारले असता एकाने लाकडी दांडक्याने डोक्यात आणि उजव्या पायावर मारहाण केली. त्यावेळी हर्षल यांच्या महाविद्यालयाची बस आली. बस पाहून हर्षल यांनी आरडाओरडा केला असता चौघेजण घटनास्थळावरून पळून गेले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.