चित्रपट पुष्पक विमान ‘घे भरारी स्वप्नांची’ (व्हिडिओ)

(दीनानाथ घारपुरे )

एमपीसी न्यूज- आजी-आजोबा आणि नातवंड ह्यांच्या मधील असलेलं प्रेम – वात्सल्य ह्या विषयी जे अतूट नाते असते ते कोणत्या अजब रसायनाने बनले आहे हे सांगता येणे कठीण आहे, एक पिढीचे अंतर असले तरी त्यांचे धागे हे घट्ट बांधलेले असतात, आजोबांचे वय वाढत असते आणि नातवाच्या वयाची सुरवात होत असते दोघे एकमेकात गुंतून पडलेले असतात, दोघेही एकमेकांची काळजी घेत असतात.

आजोबा – नातवाचं हे नाते खूप आनंदी आणि निस्वार्थी असते आजोबांनी नातवाचे खूप लाड केलेले असतात, चांगले संस्कार दिलेले असतात, जगायला शिकवलेलं असते, आजोबा नातवाची स्वप्ने पूर्ण करतात त्याप्रमाणे नातू सुद्धा आपल्या आजोबांचे स्वप्न पूर्ण करणार असतो, हा नाते संबंधाचा धागा पकडून ” झी स्टुडीओज प्रस्तुत ” पुष्पक विमान ” हा सिनेमा केला असून, ह्याची निर्मिती कान्हा मैजिक, श्री गणेश फिल्म्स आणि मार्केटिंग, ची असून निर्माते मंजिरी सुबोध भावे, अरुण जोशी, सुनील फडतरे, मुकेश पाटील हे आहेत, दिग्दर्शन वैभव चिंचाळकर यांनी केले आहे. कथा सुबोध भावे ची असून पटकथा – चेतन सैंदाणे – वैभव चिंचाळकर यांची आहे, संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिलेले आहेत, समीर सामंत – चेतन सैंदाणे यांच्या गीतांना नरेंद्र भिडे , संतोष मुळेकर यांनी संगीत दिले आहे. छायाचित्रणाची जबाबदारी महेश अणे यांनी सांभाळलेली असून या मध्ये मोहन जोशी, सुबोध भावे, गौरी महाजन, सुयश झुंझारके, राहुल देशपांडे यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत.

जळगाव मधील एका खेडयात विष्णुदास वाणी उर्फ तात्या आपल्या लहानश्या घरात रहात असतात, त्यांची शेतीवाडी असते, गावामधील देवळात तात्यांचे संत तुकारामाच्या अभंगावर आधारित कीर्तन सुरु असते. त्यामध्ये तुकोबांना घेऊन जाण्यासाठी ” पुष्पक विमान ” येते हि कथा ते रंगवून कथन करतात. पुष्पक विमानात बसण्याची त्यांची खूप इच्छा असते, विमानाचे त्यांना आकर्षण असते, विलासने लहानपणी कागदाचे विमान बनवलेलं असते, तसेच त्याला भोवरा खेळण्याचा छंद खूप असतो. तात्यांचा हा नातू विलास हा मुंबईला आपल्या बायको बरोबर रहात असतो. विलासचा तेथे गाड्यांची दुरुस्ती करण्याचा अर्थात गैरेज चा व्यवसाय असतो. आजोबा त्याला गावाकडे बोलवत असतात पण तो काही मुंबई सोडून गावाकडे जात नाही. तात्यांना सांगतो कि तुम्हीच मुंबईला रहायला या, आणि एक दिवस तो त्यांना मुंबईला घेऊन जातो. तात्यांच्या कडे एक पिशवी असते ती मात्र ते जीवापाड जपत असतात. मुंबईला जाताना ती पिशवी सुद्धा बरोबर घेऊन जातात.

मुंबई मधील जीवन तेथील पळापळ तात्यांना काही पसंत नसते, विलासची बायको स्मिता हि कोकणातली असते त्यामुळे ते तिला कोकणातल्या फणसावरून नेहमीच टोमणे मारत असतात, तात्यांना ती एक सवय असते. पण त्यांचे आपल्या नातसुनेवर जीवापाड प्रेम असते. एक दिवस तात्या – विलास – स्मिता हे फिरायला गेलेले असतांना त्यांना एक प्रचंड महाकाय विमान आकाशातून जाताना दिसते, आणि तात्यांच्या मनात विमानात ” पुष्पक विमानात ” बसण्याची इच्छा डोकावते, ते विलास ला सांगतात कि मला पुष्पक विमानात बसायचे आहे. विलास एक दिवस आपला गैरेज चा व्यवसाय वाढविण्यासाठी गावाकडील शेत जमीन – घर विकूया असे सुचवतो, पण ते तात्यांना पटत नाही, तात्यांनी विलासला खूप कष्ट करून वाढवलेल असते, त्याचे शिक्षण लग्न वगैरे करून दिलेले असते, आता फक्त त्यांना विमानात बसायचे असते, त्यांच्या ध्यानीमनी स्वप्नी फक्त तुकोबा आणि पुष्पक विमान हेच दिसत असते.

शेवटी विलास – स्मिता तात्यांची विमानात बसण्याची इच्छा कशी पूर्ण करतात ? तात्यांना विमानापार्यंत पोहोचण्यासाठी काय काय सोसावे लागते ? विमानात त्यांना कोण भेटते ? अश्या ह्या प्रश्नातून तात्यांच्या स्वप्नांचा प्रवास समजेल. आजोबा नातवाचे स्वप्न पूर्ण करतात त्याचप्रमाणे नातवाने सुद्धा आपल्या आजोबांचे स्वप्न पूर्ण करायला पाहिजे असा संदेश हा सिनेमा कळत न कळत देऊन जातो.

तात्यांची मध्यवर्ती भूमिका मोहन जोशी यांनी कमालीची रंगवली आहे, तात्यांच्या वयाच्या – मनाच्या संवेदना मधील लहान शान छटा उत्तम साकारलेल्या आहेत. विलास ची भूमिका सुबोध भावे यांनी सादर केली असून त्यातून आजोबांच्यावरचे प्रेम – वात्सल्य – राग – चिंता – लोभ इत्यादी सर्व भावना उत्कटतेने मांडल्या आहेत. त्याला साथ स्मिताच्या भुमिके मधील गौरी महाजन हिने प्रामाणिकपणे दिली आहे. वैभव चिंचाळकर यांनी केलेलं दिग्दर्शन खूप छान असून चित्रपट कोठेही रेंगाळत नाही. राहुल देशपांडे यांचा तुकाराम लक्षांत राहतो. संगीत छान आहे. एकंदरीत सिनेमा समाधान देतो….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.