Maval : मावळमधील विविध विकासकामांचा भूमिपूजन, उदघाटन कार्यक्रम रद्द –आमदार संजय बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी गुरूवारी (दि. १४) केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ३० जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याचा पुणे जिल्हा भाजपच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आमदार संजय बाळा भेगडे यांनी मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचा भूमिपूजन आणि उदघाटन सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात देशासाठी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून सर्व कार्यक्रम रद्द करावेत, असे आवाहन भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि आमदार संजय बाळा भेगडे यांनी केले आहे. केंद्रातील भाजप सरकार आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असेही आमदार बाळा भेगडे यांनी म्हटले आहे.

  • “काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्याला गुरूवारी दुपारी लक्ष्य केले. या हल्ल्यात ३० जवान शहीद झाले आहेत. तसेच अनेक जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा पुणे जिल्हा आणि मावळ तालुका भाजपच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. अशा हल्ल्याने भारत देश डगमगणारा नाही. या हल्ल्याची दहशतवाद्यांना निश्चितच किंमत चुकवावी लागणार आहे. केंद्रातील भाजप सरकार या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देईल.

भविष्यात दहशतवाद्यांना लक्षात राहिल, असा धडा शिकवला जाईल. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण पुणे जिल्हा सहभागी आहे. तसेच या हल्ल्याचा निषेधही करत आहे. आपल्या शहिद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. या हल्ल्यात ३० जवानांनी आपले प्राण गमावले असल्याने, शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून मावळ तालुक्यातील सर्व कार्यक्रम रद्द करावेत. जागोजागी जवानांना श्रद्धांजली वाहून देशाप्रती आपली समर्पित भावना व्यक्त करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.