Maval : खासदार बारणे यांची पिंपरी-चिंचवड भाजप कार्यालयास भेट

भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा 

एमपीसी न्यूज- शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड भाजप कार्यालयास भेट दिली. भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी कार्यालयास भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.

भारतीय जनता पक्षाच्या 39 व्या वर्धापनदिनानिमित्त महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड कार्यालयास भेट दिली. कार्यालयात गुढीचे पूजन केले तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन व अभिवादन केले. यावेळी भाजपचे सरचिटणीस प्रमोद मिसळ, भाजपचे स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे, रामकृष्ण राणे, नंदू भोगले, संजय परळीकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

भाजप शिवसेना पक्षाची महायुती झाली असली तरी मागील काही दिवसांपासून भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा केल्या जात होत्या. मात्र, त्याला पूर्णविराम देत भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांची मने जुळली असून महायुतीचे सर्व पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.

खासदार बारणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या 39 व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेते डॉ. बाळकृष्ण नाईक, वसंतराव वाणी, मधु जोशी आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्याचबरोबर त्यांनी पिंपरी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयास भेट दिली. कार्यालयात त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-यांशी चर्चा केली. भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या मनमोकळ्या संवादानंतर सर्व प्रकारच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.