Karjat : पार्थ पवार भजनात तल्लीन (व्हिडिओ)

कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात पार्थ पवार यांचा झंझावाती प्रचार दौरा

एमपीसी न्यूज- पार्थ पवार हे खालापूर तालुक्यात प्रचार दौऱ्यात असताना नावंडे गावात गणपती मंदिरात भजन सुरू होते. भजन सुरू असल्याचे पाहताच पार्थ पवार हे त्या मंदिरात गेले. आणि टाळ हातात घेत त्यांनी देखील भजनाचा आनंद घेतला. पार्थ पवार हे भजनात रमल्याचे पाहताच उपस्थित सर्वच लोक आश्चर्यचकित झाले. पार्थ पवार हे भजन करण्यात रमले असल्याचे पाहताच उपस्थित भजनी मंडळात आणखी उत्साह वाढला.

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी कर्जत-खालापूर मधील प्रमुख कार्यकर्त्यांच्या तसेच नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. प्रचार दौ-याला खालापूर तालुक्यातील कैरे गावापासून दौऱ्याला सुरूवात झाली.

ठिकठिकाणी पार्थ पवार यांचे औक्षण करून तसेच फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी पार्थ पवार यांना विजयी करण्याची ग्वाही दिली.

यावेळी कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेशभाऊ लाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश पाटील, आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रचारा दरम्यान पार्थ पवार यांनी खालापूर तालुक्यातील जेष्ठ नागरिक, तरुण-तरुणी, सामान्य नागरिक, महिला यांची भेट घेऊन चर्चा केली. मावळ लोकसभा मतदारसंघ राज्यत अव्वल बनविणार असल्याची ग्वाही देखील यावेळी पार्थ पावर यांनी दिली. कर्जत-खालापूर तालुक्यात अनेक त्रुटी आहेत. विद्यमान खासदारांनी अनेक प्रश्न आणि कामे प्रलंबित ठेवली आहेत. मात्र हीच विकासकामे आणि प्रश्न निवडून आल्यावर निकाली काढण्याचे आश्वासन पार्थ पवार यांनी नागरिकांना दिले आहे.

मागील दहा वर्षांपासून शिवसेनेने कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही. त्यामुळेच मावळ मतदार संघ हा विविध विकास कामापासून दुर्लक्षित झालेला आहे. मात्र आघाडीच्या हाती सत्ता दिल्यावर मावळ लोकसभा मतदारसंघ हा आदर्श मतदारसंघ असेल असे देखील ते यावेळी बोलले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.