Maval Corona Update: नवीन डझनभर रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधितांच्या संख्या शंभरीच्या पुढे!

इंदोरीत सहा, तळेगावमध्ये तीन, ब्राह्मणोली, वराळे व सोमाटणेत प्रत्येकी एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह, मावळातील कोरोनाबाधितांची संख्या 111 वर

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज नवीन 12 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाल्याने तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरचा आकडा पार केला. तालुक्यात आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या आता 111 वर पोहचली आहे. त्यापैकी 44 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आजचा एक मृत्यू धरून कोरोनाबाधित मृतांचा आकडा पाचवर पोहचला आहे. तालुक्यात एकूण 62 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

आज नव्याने नोंद झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये इंदोरीतील एकाच कुटुंबातील पाचजणांसह एकूण सहाजण, तळेगाव दाभाडे येथील तीनजण तर ब्राह्मणोली, वराळे व सोमाटणे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मावळच्या शहरी भागात 43 तर ग्रामीण भागात 68 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरी भागात तळेगावमध्ये सर्वाधिक 36, लोणावळा येथे पाच तर वडगाव मावळ येथे दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

लोणावळ्यात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

लोणावळा येथील पोर्टर चाळीतील कोरोनाबाधित महिलेचा आज संध्याकाळी मृत्यू झाल्याने मावळातील कोरोना बळींचा आकडा आता पाच झाला आहे, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

इंदोरीत कोरोनाचा प्रथमच शिरकाव, एकाच कुटुंबातील पाचजणांना बाधा

इंदोरी येथील इंद्रायणीनगर परिसरात किराणामालाचा व्यापारी असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील पाचजणांना  तर सुतारवाडा परिसरात एक 65 वर्षीय व्यक्तीच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. इंदोरी ग्रामपंचायतीच्या वतीने हा परिसर निरीक्षण क्षेत्रामध्ये ठेवण्यात आला आहे. इंदोरी परिसरात अद्याप एकही करोनाबाधित रुग्ण आढळून आला नव्हता. इंदोरीत प्रथमच करोनाचा शिरकाव झाल्याचे तसेच पहिल्याच दिवशी अर्धा डझन रुग्ण सापडल्याने इंदोरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

किराणामालाचा व्यापार तसेच वाहनचालक असलेला 55 वर्षीय पुरुष, त्याची 46 वर्षीय पत्नी, 20 व 22 वर्षे वयाच्या दोन मुली तसेच आठ वर्षांचा मुलगा असे एकाच कुटुंबातील सहाजणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लक्षणे वाटू लागल्याने हे सर्वजण तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेले होते. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आले. त्या सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

इंदोरीत पुजाऱ्यालाही कोरोनाची लागण

इंदोरीच्या सुतारवाडी परिसरात राहणाऱ्या 60 वर्षीय पुजाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्यांना कोविड केअर सेंटरला पाठविण्यात आले, मात्र हा रुग्ण निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल झाला असून त्या ठिकाणी उपचार घेत आहे. इंदोरी ग्रामपंचायतीने कोरोना रुग्ण आढळून आलेला परिसर बंदिस्त केला असून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी सदर दक्षतांबाबत परिसरात सूचना दिल्या आहेत.

तळेगावमध्ये एका महिलेसह तिघांना कोरोनाची बाधा

तळेगाव दाभाडे येथे पेस्ट कंट्रोलचे काम करणाऱ्या 36 वर्षीय पुरुष, एक 36 वर्षीय गृहिणी व यशवंतनगर परिसरातील 41 वर्षीय पुरुष अशा तिघांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. या तीन रुग्णांमुळे तळेगावातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 36 झाली आहे, अशी माहिती तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

ब्राह्मणोली, वराळे व सोमाटणे येथेही रुग्ण

ब्राह्मणोली येथील एका 68 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्याच्यावर चिंचवडच्या बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वराळे येथील एक 34 वर्षीय वाहनचालकला तसेच सोमाटणे येथील 37 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले.

या सर्व कोरोनाबाधित रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्यात आली असून त्यांचेही स्वॅब कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. लोहारे यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.