Maval News : घोरावडेश्वर डोंगरावर 200 बांबूची लागवड

एमपीसी न्यूज – हरित घोरावडेश्वर संकल्पनेतून आज (रविवारी, दि. 13) घोरावडेश्वर वनक्षेत्रात 200 बांबू रोपांची लागवड करण्यात आली. पावसाळ्याच्या सुरुवातीला झाडांची लागवड केल्यास पावसाळा संपेपर्यंत ती चांगली वाढीस लागतात, त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वृक्षारोपण करावे, असे आवाहन नियतक्षेत्र वनाधिकारी रेखा वाघमारे यांनी केले आहे.

वृक्ष रोपणावेळी नियतक्षेत्र वनाधिकारी रेखा वाघमारे तसेच निसर्ग मित्र संस्थेचे सदस्य उपस्थित होते. वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अंतर्गत नियतक्षेत्र घोरावडेश्वर येथे हरित घोरावडेश्वर ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

या संकल्पनेतून घोरावडेश्वर डोंगर आणि परिसर हिरवा करण्यासाठी वेळोवेळी वृक्षारोपण आणि संवर्धन मोहिमा राबवल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी 200 बांबू रोपांची लागवड करण्यात आली.

नियतक्षेत्र वनाधिकारी रेखा वाघमारे म्हणाल्या, “पावसाळा ऋतूमध्ये जास्तीतजास्त वृक्षांचे रोपण करायला हवे. शक्यतो पावसाळ्याच्या सुरुवातीला जास्तीतजास्त झाडे लावावी. कारण पावसाळा ऋतूत चार महिने कमी अधिक फरकाने पाऊस सुरू असतो. त्यामुळे लावलेल्या झाडांना पाणी मिळत राहते. पावसाळा संपेपर्यंत झाडे बऱ्यापैकी वाढीस लागलेली असतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान 10 झाडे लावणे आवश्यक आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.