Vadgaon Maval : शिवजयंतीनिमित्त मोहितेवाडीमध्ये डॉ. प्रमोद बोराडे यांचे व्याख्यान

एमपीसी न्यूज- तिथीनुसार आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 31 रोजी वडगाव मावळ जवळील मोहितेवाडी (साते) येथे शिवचरित्रावर आधारित प्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा. डॉ. प्रमोद बोराडे  यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामीण भागामध्ये बहुतांश भागात फाल्गुन कृष्ण तृतीया म्हणजेच तिथीनुसारच शिवजयंती साजरी केली जाते. मोहितेवाडीमध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमांद्वारे शिवजयंती साजरी करण्यात आली. गावामध्ये दारोदारी रांगोळी पायघड्या व भगवे झेंडे लावत नागरिकांमध्ये उत्साह दिसत होता.

दि. 31 रोजी हनुमान मंदिर पटांगणामध्ये इंद्रायणी महाविद्यालयामध्ये इतिहासाचे प्राध्यापक व महाराष्ट्रतील ख्यातनाम इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे  यांचे सुश्राव्य व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्करराव म्हाळस्कर  होते.

“तरुणांनी स्वप्न पहावे व त्यामागे ध्येयाने उठून पाठलाग करावा, हेच शिवचरित्र शिकवते,” असे प्रतिपादन डॉ. बोराडे यांनी केले. भास्करराव म्हाळस्कर यांनी वडगावमध्ये गेली 45 वर्षे अविरत सुरु असलेल्या सरस्वती व्याख्यानमालेचे उदाहरण देत, मोहितेवाडीमधील तरुणांनी सुरु केलेले व्याख्यान कार्यक्रमाचे रोपटे भविष्यात भव्य वटवृक्षाप्रमाणे वाढेल, अशा शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रसंगी गावातील महिलांची संख्या लक्षणीय होती. कार्यक्रमाचे नियोजन गावातील तरुण-तरुणींनी एकत्र येत केले. तसेच मुंबई पोलीसमध्ये नियुक्ती झालेले नागेश मोहिते यांचा ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान झाला.

कार्यक्रमाची सांगता शिववंदनेने झाली व सर्वांचे आभार अनंता आगळमे यांनी मानले. सूत्रसंचालन श्याम मालपोटे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.