Misbehave with Priyanka Gandhi: यूपी पोलिसांनी प्रियंका गांधी यांच्या कपड्यांची बाही पकडल्याने देशभर तीव्र संताप

प्रियंका गांधी स्वत: कारमधून खाली उतरल्या आणि आपल्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी पुढे आल्या. त्यावेळी प्रियंका गांधी यांनी पोलिसांची काठीही पकडली होती. त्यावेळी झालेल्या झटापटीत हा प्रकार घडला.

एमपीसी न्यूज : काँग्रेस कार्यकर्त्यांवरील लाठीमार रोखण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या कपड्यांची बाही खेचून उत्तर प्रदेशच्या एका पोलीस शिपायाने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या गैरवर्तणुकीचा देशात सर्व स्तरांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हाथरस येथील मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी निघाल्या असताना दिल्ली आणि नोएडा उड्डाणपुलावर पोलिसांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार सुरू केला. त्यावेळी प्रियांका गांधी स्वतः मोटारीतून उतरल्या आणि लाठीमार रोखण्याचा प्रयत्न केला.

यावेळी एक पोलीस कर्मचारी प्रियंका गांधी यांना रोखण्यासाठी त्यांच्या कपड्यांची बाही पकडून खेचताना दिसत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कृत्याबद्दल देशभर पडसाद उमटू लागले आहेत.

यूपी पोलिसांनी प्रियंका गांधींनी गैरवर्तन केल्याचा एक फोटो समोर आला आहे. कॉंग्रेस नेत्या अलका लांबा यांनी एक फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. अलका लांबा यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर करत,, मी निशब्द आहे… असे म्हटले आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं की, याची इतिहासात नोंद होईल आणि भविष्य माफ करणार नाही.

शिवसेनेचा खासदार संजय राऊत यांनीही ट्वीट करत, योगीजींच्या राज्यात महिला पोलीस नाही का? असा सवाल उपस्थित केला.

यूपी पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह पाच जणांना हाथरस येथे जाण्यास परवानगी दिली होती. पण दरम्यान हे नाट्य पहायला मिळाले.
काही कार्यकर्ते आपल्या नेत्यांसोबत जाण्यावर ठाम होते.

त्यावेळी यूपी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यावेळी प्रियंका गांधी स्वत: कारमधून खाली उतरल्या आणि आपल्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी पुढे आल्या. त्यावेळी प्रियंका गांधी यांनी पोलिसांची काठीही पकडली होती. त्यावेळी झालेल्या झटापटीत हा प्रकार घडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.