Pune – वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणारा मोस्ट वॉन्टेड आरोपी ताब्यात

एमपीसी न्यूज – गेल्या 5 वर्षांपासून मुंबईमधून देश पातळीवर वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणारा कुप्रसिध्द दलाल तसेच येरवडा पोलिस स्टेशन येथील मोक्का अंतर्गत फरार आरोपी विजय सिंग याला काल बुधवारी (दि.26) बोरीवली वेस्ट येथून ताब्यात घेण्यात आले.

कपिल श्रीमंतराव पाटील उर्फ विजय सिंग ( वय 27, रा. बोरीवली वेस्ट) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हा मुळचा मुंबईचा असून तो गेली 5 वर्षे मुंबईतून वेश्या व्यवसायासाठी देश – विदेशातील तरुणी विविध भागांमध्ये वेश्या व्यवसाय करणा-या एजंट्सना पुरविण्याचे काम करत होता. अशा गुन्ह्यांमध्ये त्याचे नाव विजय सिंग असल्याचे समोर आले होते.

त्यानंतर पोलिसांनी तपास करून त्याचे संपूर्ण नाव आणि पत्ता शोधला व गेल्या 10 दिवसांपासून त्याचा शोध पथकाकडून सुरू होता. अखेर त्याला शोधून काढण्यात पोलिसांना  काल यश आले. आरोपीला काल अटक करून आज न्यायालयात हजर
करण्यात आले आहे.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे, नरेश बलसाने, ज्ञानेश्वर देवकर, राजेन्द्र ननावरे, किरण अब्दागिरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.