MP Shrirang Barne: शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे पुणे विमानतळावर जल्लोषात स्वागत

शिवसेना पक्ष वाचावा यासाठी घेतली भूमिका

एमपीसी न्यूज: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यानंतर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आज (शुक्रवारी) पहिल्यांदाच मतदारसंघात आले. (MP Shrirang Barne) त्यानिमित्त कार्यकर्त्यांनी खासदार बारणे यांचे पुणे विमानतळावर मोठ्या जल्लोषात स्वागत केले. फुलांची उधळण करण्यात आली. “कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला”, “मावळ का नेता कैसा हो श्रीरंग आप्पा जैसा हो”, ”आप्पा बारणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, ”आम्ही फक्त आप्पा भक्त”, अशा जोरदार घोषणांनी कार्यकर्त्यांनी विमानतळ परिसर दणाणून सोडला. 

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पुणे विमानतळावर आगमन झाले. खासदार बारणे विमानतळाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, रोहित माळी, राजेंद्र तरस, कष्टक-यांचे नेते बाबा कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, कार्यकर्ते, समर्थक उपस्थित होते.

 

पत्रकारांशी बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजप-शिवसेनेची युती झाली पाहिजे. या मताशी लोकसभेतील 12 खासदार सहमत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्ही ही भूमिका मांडली. (MP Shrirang Barne) 2019 च्या निवडणुकीत मतदारांनी भाजप-शिवसेना युतीला कौल दिला होता. नंतरच्या कालावधीत महाविकास आघाडी झाली. परंतु, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसेनेला संपवू पाहत आहे. त्यादृष्टीकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेबाबत घेतलेली भूमिका आणि उचललेले पाऊल याचे आम्ही समर्थन केले आहे. बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना वाचविण्यासाठी आणि हिंदुत्वाचा विचार जागृत करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी उचललेल्या पावलाला शिवसैनिकांनी, नेत्यांनी समर्थन दिले आहे”.दरम्यान, आमचा कोणताही गैरव्यवहार नाही. आम्ही कसल्याही यंत्रणांना घाबरत नाही. असंही त्यांनी सांगितलं.

Global Academy : सविता शेटिया यांना ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमीतर्फे डॉक्टरेट 

”मावळ लोकसभा मतदारसंघात पवार परिवारातील व्यक्तीचा मी मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला. आगामी 2024 च्या निवडणुकीला सामोरे जात असताना सगळी परिस्थिती पाहता, हिंदुत्वाचा विचार, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावात आणि शिवसेना-भाजप युती असायला पाहिजे यादृष्टीकोनातून आम्ही हे पाऊल उचलले. ही भूमिका घेतना पक्षप्रमुख उद्धवसाहेबांना मी मॅसेज केला. (MP Shrirang Barne) त्यानंतर त्यांचा मला फोन आला. मी राज्य, मावळ लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती पाहता भविष्याचा विचार करुन युती होणे आवश्यक असल्याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यावर त्यांनी तुम्हाला जो वाटतो, तो निर्णय घ्या असे म्हणाले होते. मी उद्धवसाहेबांशी चर्चा करुनच निर्णय घेतला असल्याचे खासदार बारणे यांनी स्पष्ट केले.

”शिवसंपर्क अभियानाचा अहवाल पक्षप्रमुखांना दिला. राज्यातील बहुतांश शिवसैनिक महाविकास आघाडीत सहभागी असलेला राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेला संपवत असल्याचे सांगत होते. महाविकासआघाडीबाबत विचार करण्याचे आवाहन शिवसैनिक करत होते. परंतु, राष्ट्रवादीला सोडले नाही. आमचा कोणता गैरव्यवहार नाही. गेले 27 वर्ष मी राजकारणात आहे.  कसल्याही यंत्रणांना घाबरत नाही. परंतु, शिवसेना पक्ष वाचवा ही आमची भूमिका आहे. कार्यकर्ते मोठ्या संख्येने या भूमिकेशी सहमत आहेत. आम्ही सुरुवातीपासून उद्धवसाहेबांसोबत होतो. त्यांच्यासोबत चारवेळा बैठक झाली. परंतु, राष्ट्रवादीची आघाडी तोडण्यासंदर्भात त्यांची भूमिका नव्हती.

त्यामुळे पुढचा विचार करुन भविष्यात आम्ही सन्मानाने भाजपसोबत राहणार आहोत. माझ्या विजयात भाजपचा 60 ते 70 वाटा आहे. मी भाजप पदाधिकारी दुखावू दिले नाहीत. (Mp Shrirang Barne) ज्यांच्या मतावर निवडून आलो. त्यांचा सन्मान ठेवण्याची माझी भूमिका राहिली आहे. मावळ मतदारसंघ  राष्ट्रवादीला सोडण्याबाबत त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भूमिका घेतल्यावर शिवसेनेचा एकही नेता त्यावर बोलला नाही”.

”एकनाथ शिंदे यांचा पक्षप्रमुख होण्याबाबत कोणताही मनोदय नाही. न्यायालयात निर्णय विरोधात गेला तर काय, याबाबत विचारले असता खासदार बारणे म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला जाईल. परंतु, आम्ही जी भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेचे शेवटपर्यंत समर्थन करणार आहोत. महाविकास आघाडी सरकारकडून खासदारांना कोणतेही सहकार्य मिळत नव्हते. परंतु, राष्ट्रवादी पक्ष सर्वाधिक निधीचा वापर करत होता. जोपर्यंत युतीत सहभागी होतो, तोपर्यंत केंद्राकडून चांगले सहकार्य मिळत होते. महाविकास आघाडी झाल्यानंतर सहकार्य मिळत नव्हते.  शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबात पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली होती. रोज उठून कोणाच्या घरावर दगड मारण्याची आवश्यकता नसते. ते आपल्या संस्कृतीला शोभत नाही. 2024 ची निवडणूक कोणाकडून लढविणार याबाबत विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे युतीच्या माध्यमातून त्याबाबत निर्णय घेतील. 2024 मध्ये मी मावळातून उमेदवार असणार आहे”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.