PCMC : ‘महापालिका कर्मचा-यांनी तंत्रज्ञानासोबत जुळवून घेत कार्यपध्दतींचा अवलंब करावा’

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या कर्मचा-यांना सूचना

एमपीसी न्यूज –  जी.आय.एस. प्रणालीद्वारे महानगरपालिका क्षेत्रामधील मिळकतीसाठी सुधारीत सेवा, संसाधनांचे सुधारित नियोजन, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, पारदर्शक प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे. महापालिकेच्या कार्यपध्दती गतिमान होण्यासाठी ३५ हून अधिक आयटी ऍप्लिकेशन्स एकात्मिक पद्धतीने विकसित केले असून हे मॉड्यूल ४० हून अधिक महापालिकेतील विभागांमध्ये लागू होणार आहे.

Alandi : इंद्रायणी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने भक्ती सोपान पूल रहदारीस बंद

१५ ऑगस्टपुर्वी या संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  महापालिका कर्मचा-यांनी तंत्रज्ञानासोबत जुळवून घेवून कार्यपध्दतींचा अवलंब करावा, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी दिल्या.

जीआयएस ईआरपी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मनपाच्या संबंधित विभागातील अधिकारी- कर्मचारी यांची ऑटो क्लस्टर येथे बुधवारी प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली.

त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, उज्वला गोडसे, सहाय्यक आयुक्त उमाकांत गायकवाड, प्रकल्प सल्लगार कल्पेश बोंडे, प्रकल्प व्यवस्थापक अविनाश पाटील यांच्यासह २०० हून अधिक अधिकारी – कर्मचारी यांनी कार्यशाळेला उपस्थिती लावली. तसेच, प्रश्नोत्तराद्वारे अधिकारी – कर्मचा-यांच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले.

सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रकल्पांतर्गत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) १००० हून अधिक प्रक्रियांवर व्यवसाय प्रक्रिया पुनर्रचना करण्यात आली आहे. मिळकतीचे सर्वेक्षण व माहिती संकलित करण्यासाठी ऐटॉस इंडिया प्रा.लि. यांचे मार्फत सर्व्हेअर / कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

ईआरपी, जीआयएस आणि डिजिटल वर्कफ्लो मॅनेजमेंटची संपूर्ण कार्यक्षमता एकमेकांशी जोडलेली आहे. या उपक्रमांतर्गत, GIS ची कार्यक्षमता विभागांच्या दैनंदिन कामकाजाशी जोडली जाणार आहे. जेणेकरून PCMC चा GIS डेटाबेस सतत आणि रिअल टाइम आधारावर अपडेट करता येईल.

जीआयएस (GIS) सक्षम एकात्मिक (ERP) प्रकल्प भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. ज्या ठिकाणी महानगरपालिका सर्व विभाग जीआयएस (GIS) वातावरणात इआरपी द्वारे जोडले जातील. तसेच, एंटरप्राइझ-वाइड रिसोर्स प्लॅनिंग दृष्टीकोन द्वारे महानगरपालिकेच्या विविध भू-स्थानिक माहितीचा (डेटा) सर्वात चांगल्या प्रकारे वापर होऊन नागरिकांना कार्यक्षम आणि प्रभावीपणे सेवा प्रदान करण्यास मदत होणार आहे, या तंत्रज्ञानाने अनधिकृत बांधकामे, शहराची वाढ, अतिक्रमण इत्यादी शोधून त्यानुसार योग्य नियोजन किंवा शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत येणा-या सर्व मालमत्तांचे जी.आय.एस./GIS (भौगोलिक माहिती प्रणाली / Geographical Information System) सर्वेक्षण स्मार्ट सिटी मार्फत हाती घेण्यात आले आहे.

तसेच, पारदर्शक प्रशासन व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी  मनपा व स्मार्ट सिटी लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्वेक्षणाचे कामकाज करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी लिमिटेडने जीआयएस सक्षम ईआरपीवर एकात्मिक प्रकल्प म्हणून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, जीआयएस, ईआरपी आणि डिजिटल वर्कफ्लो व्यवस्थापन सुरू झाल्यापासून एकात्मिक पद्धतीने विकसित केले जात आहे.

प्रकल्प सल्लागार यांनी प्रकल्पाचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये सादरीकरण केले. तसेच विकसीत होत असलेल्या प्रणालीची चाचणी कशी करावी याबाबत माहिती दिली. जीआयएस, ईआरपी आणि वर्कफ्लो मॅनेजमेंट सिस्टम एकात्मिक पद्धतीने विकसित केले जात आहेत. संपूर्ण शहरासाठी लायडर (LiDAR) सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाद्वारे १० सेंटीमीटर एवढी लहान वस्तू देखील अचूकतेने सहजपणे मोजली जाऊ शकते. झोपडपट्ट्यांमध्ये बॅकपॅकच्या साहाय्याने LiDAR सर्वेक्षण केले जात आहे.

त्याद्वारे संपूर्ण शहर ३६०-डिग्रीमध्ये टिपले गेले आहे. उत्तम प्रशासनासाठी LiDAR डेटा आणि GIS बेस मॅपसह एकत्रित केला जाणार आहे. हा डेटा मालमत्ता कर डेटाबेससह एकत्रित करून अधिकार्‍यांकडून मालमत्तांना प्रत्यक्ष भेट न देताही पडताळणी केली जाऊ शकते. GIS डेटाबेसमध्ये ३००+ GIS स्तर आहेत, ज्यात पाईप लाईन, ड्रेनेज लाईन इत्यादी भूमिगत उपयुक्ततेचे संपूर्ण नेटवर्क आहे.

यामध्ये शहराचे दृश्य 3D प्रतिमेमध्ये दाखविण्यात येणार आहे. शहराच्या भू-भागाचा अभ्यास करण्यासाठी आणि पाणी तुंबण्याची ठिकाणे ओळखण्यासाठी शहराचे डिजिटल एलिव्हेशन मॉडेल (DEM) तयार करण्यातही ते मदत करेल.  सद्य:स्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरात सहा लाख हून अधिक मालमत्तांचे घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रसंगी, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे, वायसीएमचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे, प्रकल्प व्यवस्थापक अविनाश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.