Nigdi Crime News : लॉजमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; चौघांना अटक

एमपीसी न्यूज – लॉजमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये लॉज मालकासह चौघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई थरमॅक्स चौकातील ऐश्वर्या लॉज येथे सोमवारी (दि. 2) दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आली.

अशोक तुकाराम आखाडे (वय 45, रा. संभाजीनगर, चिंचवड), विजय बापूराव गोलाईत (वय 46, रा. घरकुल, चिखली), संजय विक्रम सपकाळ (वय 38, रा. चिखली), अंबादास सखाराम वाघ (रा. मोरे वस्ती, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी कंठय्या गुरय्या स्वामी यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आखाडे याने त्याच्या आर्थिक फायद्यासाठी त्याच्या मालकीच्या ऐश्वर्या लॉजमध्ये जुगाराचा अड्डा चालवला. त्यामध्ये आरोपी तीन पत्ती नावाचा जुगार खेळत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.