Nigdi News: ‘भक्ती-शक्ती चौकात आत्ताच पार्किंगचे नियोजन करा’

शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात ग्रेडसेपरेटर, उड्डाणपुल व वर्तुळाकार रस्त्याचे (रोटरी) काम वेगात सुरु आहे. त्यामुळे भक्ती-शक्ती चौकात येणा-या पर्यटकांसाठी पार्किंगचे आत्ताच नियोजन करणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात पार्किंगची समस्या जाणवणार नाही. त्यासाठी शिल्पाच्या आजूबाजूची जागा अधिगृहीत करून अधिकृत वाहनतळाची निर्मिती करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक, विधी समितीचे सदस्य अमित गावडे यांनी पालिकेकडे केली आहे.

याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक गावडे यांनी म्हटले आहे की, पुणे – मुंबई जुन्या महामार्गावरील निगडीच्या भक्ती – शक्ती समूह शिल्प चौकात उड्डाणपूल ,ग्रेडसेपरेटर आणि वर्तुळाकार मार्गाचे काम सुरु आहे.

त्यातील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. वाहतूक व्यवस्था सुरळित करण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावरील भाग खुला करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

भक्ती – शक्ती शिल्प समुह चौकात सायंकाळी पर्यटकांची मोठी गर्दी असते. तेथे शहराच्या विविध भागातील नागरिक लहान मुलांना फिरायला घेवून येतात. त्यामुळे चौक गर्दीने फुलून जातो. अधिकृत पार्कींगची सोय नसल्याने नागरिक रस्त्यावर अस्ताव्यस्त, बेशिस्तपणे वाहने उभी करतात. परिणामी, चौकातील वाहतूक कोंडीत भर पडते.

आता पुलाचे काम सुरू असतानाच पार्कींगचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी आत्ताच जागा अधिग्रहित करून त्याठिकाणी अधिकृत वाहनतळाची निर्मिती करावी. जेणेकरून भविष्यात अस्ताव्यस्त वाहने पार्क होणार नाहीत आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही. समूह शिल्पाच्या सौंदर्याला बाधाही पोहोचणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी.

तसेच शिल्प समूहाच्या उद्यानासमोरील रस्त्यावर हातगाडीवाले, फेरीवाले, पथारीवाले बसणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. पुलाखालील जागेचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. त्या मोकळ्या जागेत कोणी अतिक्रमण करू नये याची दक्षता घ्यावी. त्यासाठी तेथे झाडांची लागवड करावी. सुशोभीकरण करावे, अशी सूचना नगरसेवक गावडे यांनी पालिका प्रशासनाला केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.