Pimpri News: शेवटच्याक्षणी आयुक्तांचा ‘स्पर्श’ला दणका, बिलं थांबविली; चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची आज (शुक्रवारी) बदली झाली असली तरी त्यांनी जाताजाता पालिकेला खोटी बिले सादर करणा-या स्पर्श हॉस्पिटला मोठा दणका दिला आहे. स्पर्श संस्थेच्या सीसीसी सेंटरच्या बिलामध्ये मोठ्या प्रमाणात संदिग्धता दिसत असल्याने या प्रकरणी चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत या संस्थेची उर्वरित बिले देण्यास मज्जावही केला आहे. चौकशीत संस्था दोषी आढळल्यास दिलेली बिले वसूल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

स्पर्श संस्थेने उभारलेल्या सीसीसी सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल न करता संस्थेने महापालिकेकडे 5 कोटी 26 लाख 60 हजार 800 रुपये एवढे बिल सादर केले होते. यावर हे बिल चुकीचे असून संस्था महापालिकेची फसवणूक करत असल्याचा शेरा एका लिपिकाने दिला होता.

मात्र, हे सर्व डावलून महापालिकेने स्पर्श संस्थेला 3 कोटी 29 लाख 40 हजार रुपये बिल अदा केले. या प्रकारामुळे महापालिकेच्या आणि थेट आयुक्तांच्या कारभारावरच मोठ्या प्रमाणात टीका झाली. ठेकेदारांच्या फायद्यासाठीच आयुक्त हे सर्व करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. स्पर्शचे प्रकरण चांगलेच गाजत असल्याने शेवटी आयुक्तांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले आहे.

आज शुक्रवारी दुपारी आयुक्तांच्या बदलीचा आदेश निघाला. मात्र, त्या आधी स्पर्शच्या माध्यमातून होणारे भ्रष्टाचाराचे आरोप पुसून काढण्यासाठी त्यांनी स्पर्शच्या चौकशीचे आदेश दिले. स्वतःसह आणखी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती नेमली.

या समितीचा चौकशी अहवाल येईपर्यंत स्पर्शाला कोणतेही बिल अदा करू नये असा आदेशही त्यांनी काढला. त्याचप्रमाणे चौकशीत स्पर्श संस्था दोषी आढळल्यास त्यांच्याकडून अदा केलेली रक्कम वसूल केली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

नवीन आयुक्तांना स्पर्श प्रकरणाची संपूर्ण माहिती देणार आहे. तसेच चौकशी समितीत राहून स्वतः आयुक्तांनी चौकशी पूर्ण करण्याची विनंती करणार आहेत. त्यामुळे हर्डीकरांनी जाताजाता स्पर्शला दणका दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.