Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरातील पोलीस स्टेशन मध्ये मागील चोवीस तासात एक सुद्धा गुन्हा दाखल नाही

एमपीसी न्यूज – जनता कर्फ्यूच्या दिवशी (22 मार्च) पिंपरी-चिंचवड शहरातील पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झाला नाही. त्यानंतर शनिवारी (2 मे) याचीच पुनरावृत्ती झाली आहे. आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर दुसऱ्यांदा सर्व पोलीस स्टेशन गुन्हा दाखल होण्याबाबत निरंक राहिली आहेत.

जनता कर्फ्युच्या दिवशी (रविवार, 22 मार्च) नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरीच राहण्याला पसंती दिली. गुन्हेगारी प्रवृत्ती देखील या दिवशी बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झाला नाही. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यापासून असा ‘निरंक’ राहण्याचा प्रसंग प्रथमच घडला.

शनिवारी देखील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 15 पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल न झाल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळत असते. मात्र, शनिवारी एकही गुन्हा दाखल झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली नाही. शनिवारी कोणीही पोलीस ठाण्यांकडे आपल्या तक्रारी घेऊन फिरकलेच नाही. त्यामुळे शनिवारी शहरातील सर्वच पोलीस स्टेशन गुन्ह्यांच्या बाबतीत ‘निरंक’ राहिले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट 2018 रोजी सुरु झाले. तेंव्हापासून एकही गुन्हा दाखल न होण्याचा हा दुसरा प्रसंग आहे. त्यामुळे पोलीसांमधून समाधानकारक आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान सरकारी आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर पोलिसांची कारवाई सुरूच आहे. शनिवारी 133 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.