Pimpri : भूलशास्त्र दिनाच्या निमित्ताने

एमपीसी न्यूज – “नेहा अभिनंदन ……… अभिनंदन!” बघ किती घाबरत  होतीस न प्रसुतीला ” ?  “हो ग मावशी, खरंच तुमच्या भूलशास्त्राची अगदी कमालच आहे बुवा ! तु मला वेदनारहिता प्रसुतीची माहिती दिलीस आणि या सुविधेचा लाभ घेऊन माझी प्रसुती ‘कळा’ न येता फारच सुखकर झाली. मी तुझी व तुम्हा सर्व भूलतज्ञांची शतश: आभारी आहे. 
 नेहाशी गप्पा मारताना भूलशास्त्राचा इतिहास माझ्या डोळ्यांसमोर तरळला. फार पूर्वी शस्त्रक्रियेच्या वेळी वेदना होऊ नयेत म्हणून रुग्णाच्या डोक्यावर वार करुन, दारु पाजून किंवा अफू – गांजा वगैरेचा वापर करुन त्याला निपचित केले जात असे. पण ईथर चा उपयोग डब्ल्यू. टी. जी. मॉर्टन यांनी 16 ऑक्टोबर 1846 रोजी मॅसॅचुसेटस जनरल हॉस्पिटलमध्ये डॉ. वॉरन यांना त्यांच्या गिलबर्ट अॅबट या रुग्णाच्या जबड्यातील गाठ वेदनेशिवाय काढता येते हे दाखवून दिले आणि भूलशास्त्राचा पाया रचला. म्हणून 16 ऑक्टोबर हा भूलशास्त्र दिवस पूर्ण जगात साजरा केला जातो. त्यानंतर सतत रुग्णाची सुरक्षितता हेच उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेवून अनेक नवीन औषधे भूल देण्यासाठी सिध्द झाली. आता भूलशास्त्र हे अतिशय प्रगत शास्त्र झाले आहे. त्यामुळे त्यात पारंगत होण्यासाठी एम. बी. बी. एस नंतर दोन किंवा तीन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यास पूर्ण करावा लागतो.
* भूल देण्यापूर्वी रुग्णाच्या विविध अवयवांचे काम योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी काही चाचण्यांची आवश्यकता आहे. उदा. रक्त, लघवी, इ.सी.जी, एक्सरे वगैरे.
*  रुग्णाने आपल्या विविध आजारांची (उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, दमा, अॅलर्जी, फिटस) व त्यासाठी चालू असलेल्या औषधोपचारांची माहिती भूलतज्ञाला देणे जरुरीचे असते.
* भूल देण्यापूर्वी कमीत कमी चार ते  सहा तास उपाशी पोटी असणे अतिशय महत्वांचे असते.
* रुग्णाने आपल्या व्यसनांची माहिती इमानदारपणे देणे अपेक्षित असते. कारण दारु, तंबाखू, विडी, सिगारेट, गुटखा हे भूलीचे शत्रू आहेत.
*भूल देण्यापूर्वी चष्मा, कवळी, नेलपॉलिश, कॉन्टॅक्ट लेन्स, दागिने काढून  ठेवावेत.
* भूल प्रामुख्याने तीन प्रकारची असते.
_MPC_DIR_MPU_II
1) लोकल – फक्त ऑपरेशनच्या जागी देण्यात येणारी भूल.
            2) रिजनल – शरीराच्या एखाद्या भागापुरती.
            3) जनरल – संपूर्ण भूल, विस्मरण, बेशुध्दावस्था, वेदनानिवारण आणि  स्नायुशिथिलता या चार गोष्टी यात साध्य करता येतात.
* स्पायनल अॅनेस्थेशिया – यात पाठीच्या दोन मणक्यांमधील जागेत एक अतिशय बारीक (केसाएवढी) सुई टोचुन विशिष्ट औषध दिले जाते. ज्यामुळे कंबरेखालील भाग काही काळासाठी बधीर होतो. या सुईमुळे कंबरदुखी होते हा एक गैरसमज आहे.
* संपूर्ण शस्त्रक्रिया होईपर्यंत भूलतज्ञ रुग्णाचा रक्तदाब, नाडीचे ठोके, श्वसनक्रिया, तापमान व मूत्रपिंडाचे कार्य यांचे नियंत्रण करत असतो.
* भूलशास्त्र हे अद्याप परिपूर्ण नाही. आणि गणितामधील 2 + 2 = 4  हे सूत्र  येथे नेहमीच लागू होते असे नाही. कारण प्रत्येक व्यक्ती व  तिला असलेले आजार यामुळे एखाद्या औषधाचा परिणाम ठराविक प्रमाणात न होता कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे शस्त्रक्रिये दरम्यान कधी अनपेक्षित गुंतागुंत झाल्यास भूलीची मात्रा जास्त झाली असे सर्वसाधारण विधान करु नये.
*भूल देण्यास सुरुवात केल्यापासून ते संपेपर्यंत म्हणजेच झोपी गेलेला परत जागा होईपर्यंत शल्यविशारदाच्या बरोबरच भूलतज्ञांचेही कौशल्यपणाला लागलेले असते.
*भूल ओसरल्यानंतर थोड्या प्रमाणात मळमळणे उलटी होणे घसा दुखणे ग्लानी असणे किंवा वेदना जाणवणे असे होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय रुग्णाला खाण्या-पिण्यास देऊ नये, वाहन चालवू नये किंवा गॅसपाशी जाऊ नये.
* ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणारा भूलतज्ञ पडद्यामागचा कलाकार समजला  जातो. पण आता तो इतरही वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कौशल्याची चुणुक दाखवित आहे.
  उदा. 1) वेदनारहित प्रसुती 2) दिर्घकालीन व तीव्र वेदना निवारण केंद्र, 3) अतिदक्षता विभाग. सध्या प्रत्येक नागरिक जीवनरक्षक हे साध्य करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व भूलतज्ञ सोप्या शब्दात बेसिक लाईफ सपोर्ट बद्दल लोकांमध्ये जनजागृती करत आहेत. तर असे हे भूलशास्त्र प्रत्येक शस्त्रक्रियेची जीवनरेखा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.