Pune : अवयवांच्या प्रतिकृतीतून वारक-यांसमोर अवयवदान जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज – अवयवदान म्हणजे काय, कोणत्या अवयवांचे दान करता येते, अवयवदान कोण करु शकतो, अवयवदानाची प्रक्रिया काय, अशा अनेक प्रश्नांना अवयवांच्या चित्ररुपी प्रतिकृतीतून उत्तरे देत पालखी सोहळा आगमनाला वारक-यांसमोर अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारक-यांसमोर अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासोबत अवयवदानाचे महत्त्व चित्रांच्या माध्यमातून सांगण्यात आले. 
 
श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट, आम्ही पुणेकर, नोकॉर्ड हेल्थ क्लब आणि पिंपरी-चिंचवड ब्लड बँकेतर्फे शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट परिसरात हे अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डॉ.गजानन एकबोटे, डॉ.अनुराधा पोतदार, आयोजक डॉ.राजेंद्र खेडेकर, हेमंत जाधव, अ‍ॅड.मिलींद पवार, प्राची मानकर, किशोर चिपोळे, आनंद लोंढेनवार, प्रमोद भडके, नितीन वाघीरे आदी उपस्थित होते. वाघीरे देवी पूजक संघातील कार्यकर्त्यांनी अभियानात सक्रिय सहभाग घेतला. 

 
मानवी शरीरातील मेंदू, डोळे, किडणी, त्वचा यांसारख्या विविध अवयवांची मोठी प्रातिनिधीक चित्रे संस्थेतर्फे साकारण्यात आली होती. तसेच अवयव आणि त्यांचे महत्त्व चित्रांद्वारे वारक-यांना पटवून देण्याचा प्रयत्नही यावेळी करण्यात आला. याशिवाय श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे मोफत औषधोपचार आणि रुग्णवाहिका देखील वारक-यांसाठी सज्ज होती. 
डॉ.राजेंद्र खेडेकर म्हणाले, जिवंतपणी वा मरणोत्तर नि:स्वार्थपणे आपला अवयव दुस-या व्यक्तीस देणे म्हणजे अवयवदान. प्रत्येक रुग्णालयात अवयवदान प्रत्यारोपण समन्वयक असतात. त्यांच्याकडून याविषयीची माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. आपल्यामुळे अपंग व्यक्तींना पुन्हा एकदा सामान्यांप्रमाणे जीवन जगता येऊ शकेल. त्यामुळे प्रत्येकाने किमान मरणोत्तर अवयवदान तरी करायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.