PCMC : कारवाई विरोधात फेरीवाल्यांचे हातगाडीसह चक्काजाम आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अ ते ह सर्वच क्षेत्रीय कार्यालयाच्या (PCMC) अंतर्गत आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशाने सुरु असलेल्या जप्ती कारवाईचा निषेध करत आणि पथ विक्रेता कायद्याची अंमलबजावणी करा, सर्वांना परवाने व आधी हॉकर झोन नंतरच कारवाई अन्यथा जेलभारो आंदोलनाचा इशारा देत शहरातील, हातगाडी स्टॉल धारकांनी हातगाडीसह महापालिका गेटसमोर हातगाड्या लावून चक्काजाम आंदोलन केले.

नॅशनल हॉकर फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या तर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, राजू बिराजदार, गणेश जगताप,राजेश माने, प्रमोद गवई,किरण साडेकर, विठ्ठल कड,राजू खंडागळे, दत्ता जाधव, सागर ठोंबरे, नवनाथ जगताप, सलीम डांगे, विजय दिवटे,सलीम शेख,यासीन शेख,माधुरी जलमुलवर,स्मिता मसुरे, वृषाली पाटणे,अंजु तायडे,मुमताज शेख,जरीता वाठोरे,नंदा तेलगोटे, वहिदा शेख, मंगल कांबळे आदी उपस्थित होते.

मोरवाडी चौकातील अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोठ्या घोषणा देत शहरातील दापोडी, निगडी,आकुर्डी, पिंपरी, भोसरी,डांगे चौक, काळेवाडी, रहाटणी, घरकुल, चिखली, थरमॅक्स चौक ,रावेत वल्लभनगर ,अशा परिसरातील विक्रेत्यानी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हातगाड्या घेऊन मोरवाडी चौक ते महापालिका भवन असा भव्य मोर्चा काढत सर्वांना परवाने द्या, सर्वांना स्थिर जागा द्या, अन्यकारक कारवाई त्वरित थांबवा अशा घोषणा देत महापालिका भावना समोर हा मोर्चा आला. महानगरपालिकेच्या गेटवर पूर्ण हातगाड्या लावून या मोर्चाचे सभेत (PCMC) रूपांतर झाले.

Chinchwad : तांत्रिक कौशल्यावर तपास करत पोलिसांनी जप्त केले 69 मोबाईल

यावेळी नखाते म्हणाले की, महापालिकेकडून एकतर्फी व कायदा झुगारून कारवाई सुरू आहे. एकीकडे महापालिका सक्ती करून फॉर्म भरून दहा, वीस हजार रुपयांचे कर्ज देत आहे. मात्र त्यावर कारवाई करून जप्त करत आहेत असे करता येत नाही. मात्र असे केल्यास कर्जे कोण फेडणार ? शहराचा विकास साधताना केवळ श्रीमंतांचा विचार न करता सर्व घटकांचा विचार व्हावा. श्रीमंताच्या चार चाकी गाड्यांना जागा सन्मानाने दिली जाते. मात्र फेरीवाल्यांना टार्गेट केले जात आहे हे चुकीचे आहे.

शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना दिले. यावर त्यांनी हॉकर झोन करता येईल अशा जागा सुचवव्यात, फेरीवालाबाबत सकारात्मक प्रस्ताव द्यावा, आयुक्त यांचेसोबत येत्या चार दिवसांमध्ये बैठक घेऊन कारवाई शिथिल करून फेरीवाल्यांचा प्रश्न योग्य रीतीने मार्गी लावण्यात येईल आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.