PCMC: सेप्टिक टँकच्या ठेकेदारांनी कामाच्या स्वरुपाची नोंदणी करावी, आयुक्तांची सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरास (PCMC) ‘वाटर प्लस’ प्रमाणीकरण प्राप्त व्हावे, यासाठी महापालिका नियोजन करून अंमलबजावणी करीत आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सेप्टिक टँक स्वच्छतेचे काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांनी त्यांच्या कामाच्या स्वरुपाची नोंदणी महापालिकेकडे करणे बंधनकारक असून अनौपचारिक, असुरक्षित काम करताना आढळल्यास तसेच मैला उघड्यावर उत्सर्जित करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील सेप्टिक टँक साफसफाई करणाऱ्या ठेकेदारांना दिल्या.

पिंपरी-चिंचवड शहराला देशातील सर्वात स्वच्छ, सुंदर व राहण्यास सुलभ तसेच सर्व सोयीसुविधायुक्त शहर म्हणून नावलौकिक मिळविण्यासाठी महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2023 स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबविण्यात येत असून शहरातील सेप्टिक टँक साफसफाई करणाऱ्या सर्व ठेकेदारांनी काम सुरु करण्यापूर्वी त्यांच्या कामकाजाचे स्वरूपाविषयी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे गरजेचे असून, महापालिकेच्या हद्दीत अनौपचारिकरित्या काम करताना, असुरक्षितरित्या काम करताना किंवा मैला उघड्यावर उत्सर्जित करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

सेप्टिक टँक आणि भुयारी गटारांच्या तक्रार निवारणासाठी महापालिकेने 24 X 7 कार्यान्वित असलेला 14420 हा हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून दिला आहे. सफाई मित्रांनी साफसफाई करतांना सुरक्षा किटचा वापर करावा, आपल्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य द्यावे, तसेच आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले असून नागरिकांनी सेप्टिक टँक आणि भुयारी गटारांच्या सुरक्षित साफसफाईसाठी महापालिकेकडे नोंदणीकृत असलेले सफाई मित्रच नेमावेत, असे आवाहन देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Kalewadi : कारागिराने पळवली 29 तोळ्याची सोन्याची बिस्किटे

महापालिकेच्या वतीने स्वच्छता कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी व स्वच्छता मोहीम (PCMC) प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. याद्वारे कर्मचा-यांना स्वच्छता कार्यात वापरावयाच्या सुरक्षा साधनांचा वापर कसा करावा, मानसिक व शारीरिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासोबतच विविध कच-याचे वर्गीकरण कसे करावे याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.