Pimpri: टेनिसपटूंना मिळणार शास्त्रोक्‍त प्रशिक्षण; महासभेसमोर प्रस्ताव

महापालिका आणि नंदन बाळ यांचा संयुक्‍त उपक्रम, पाच टेनिस कोर्ट चालवायला देणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांत दहा लॉन टेनिस कोर्ट चालविली जातात. त्यापैकी पाच ठिकाणी भारतीय टेनिस टिमचे प्रशिक्षक नंदन बाळ हे शहरातील 50 खेळाडूंना टेनिसचे शास्त्रोक्‍त प्रशिक्षण देणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव आज (शनिवारी) झालेल्या महासभेसमोर आयत्यावेळी दाखल करुन घेण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची जानेवारी महिन्याती सर्व साधारण सभा आज आयोजित केली होती. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, विश्व हिंदू परिषदेचे माजी प्रमुख विष्णू हरी दालमिया, क्रीडा प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहून आजची सभा 4 फेब्रुवारी दुपारी दोनवाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

महापालिकेच्या क्रीडा विभागाअंतर्गत शहराच्या विविध दहा ठिकाणी टेनिस कोर्ट चालविली जातात. यामध्ये निगडी प्राधिकरणातील गणेश तलावानजीक आणि बाहुबली व्यायामशाळेजवळ सेक्‍टर क्रमांक 25 तर सेक्‍टर क्रमांक 26 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस टेनिस कोर्ट चालविली जातात. तसेच चिंचवडगाव, मोहननगर, इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्‍वर क्रीडा संकूल, मोशी प्राधिकरण स्पाईनरोड येथील सेक्‍टर क्रमांक 4, महात्मा फुलेनगर, कासारवाडी आणि सांगवी अशा एकूण दहा ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेनिसपटू निर्माण करण्यासाठी अशिया खंडातील सार्वत श्रीमंत महापालिका असलेल्या पिंपरी महापालिकेला या दहा ठिकाणी प्रशिक्षक नेमणे शक्‍य नाही. त्यामुळे ज्या खेळाडूंना सराव करायचा आहे, ते सर्वजण वर्गणी काढून प्रशिक्षकाकडून टेनिसचे धडे गिरवत आहेत. त्यामुळे लॉन टेनिस प्रशिक्षण केंद्र सुरु करणे महत्त्वाचे असल्याचे महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांचे मत बनले आहे. भारतीय टेनिस संघाचे प्रशिक्षक असलेले नंदनबाळ टेनिसेचे धडे देणारी क्रीडा संस्था चालवतात. पुणे शहरातील फर्ग्युसन महाविद्यालय, स. प. महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ते खेळाडूंना टेनिसचे धडे देत आहेत. शहरातील दहा टेनिस कोर्टपैकी मोहननगर, प्राधिकरण, चिंचवडगाव तसेच इंद्रायणीनगरमधील संत ज्ञानेश्‍वर क्रीडा संकूल आणि महात्मा फुलेनगर या पाच ठिकाणी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

महापालिका शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावीतील एकूण 50 विद्यार्थ्यांना टेनिस क्रीडा प्रकारातील बेसिक, इंटरमिडीएट आणि ऍडव्हान्स हे तीन प्रकारचे प्रशिक्षण केवळ दरमहा 100 रुपये प्रशिक्षण शुल्क आकारून देणे बंधनकारक आहे. या सर्व खेळाडूंना रॅकेट, शूज आणि किट महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून पुरविण्यात येणार आहे. मात्र, अन्य विद्यार्थी खेळाडूंकडून बेसिक ट्रेनिंगसाठी दीड हजार रुपये, इंटरमिडीएटसाठी अडीच हजार रूपये तर ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी साडे तीन हजार रुपये शुल्क आकारणीस महापालिका प्रशासनाकडून परवानगी दिली जाणार आहे. याकरिता महापालिकेकडून या संस्थेच्या प्रशिक्षकांना कोणतेही मानधन दिले जाणार नसून, ती जबाबदारी संस्थेची असणार आहे.

देखभालीची जबाबदारी संस्थेची!
या पाचही टेनिस कोर्टवर महापालिकेचा मालकी हक्‍क असणार आहे. मात्र, या संस्थेशी करारनामा केल्यानंतर या सर्व टेनिस कोर्टवर सुरक्षा रक्षक, काळजीवाहक, प्रशिक्षक यांची नेमणूक व वेतन व मानधनाची जबाबदारी संस्थेची असणार आहे. याशिवाय या कोर्टची साफसफाईची जबाबदारी देखील या संस्थेची असणार आहे. महापालिका हद्दीतील विद्यार्थी खेळाडूंना सरावासाठी बॅच उपब्ध करुन देणे बंधनकारक असून एका तासाच्या बॅचकरिता कमाल 50 रुपये शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारू नये, असे या करारनाम्यात नमूद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.