Pimpri: सीमा प्रश्नांसाठी शिवसेनेने रक्त सांडले; भाजपला सीमावासियांचे काही देणे घेणे नाही – संजय राऊत


एमपीसी न्यूज – भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील कर्नाटकमध्ये जातात. कानडीचे गोडवे गात आहेत. भाजपवाल्यांना मराठी माणसाचे, सीमा प्रश्नांचे काही घेणे-देणे नाही.  सीमा प्रश्नांसाठी शिवसेनेने रक्त सांडले आहे. सत्तेवर बसलेले सरकार मराठी माणसाच्या हिताचे नाही. त्यामुळे हे राज्य घालविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे प्रतिपादन, शिवसेना नेते, खासदार, पुणे विभागीय  संपर्क नेते संजय राऊत यांनी केले. तसेच शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी आहे. भाजप हिंदुत्ववादी आहे की नाही हे तपासावे लागेल. रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले काहीही बोलतात, अशांना सत्तेतील पक्षाने समज दिली पाहिजे, असेही ते म्हणाले. 

पिंपरी – चिंचवड शहरातील शिवसेना पदाधिकारांच्या  मतदारसंघ निहाय बैठका आज (बुधवारी) संजय राऊत यांच्या उपस्थितीत झाल्या.  त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार राऊत बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख योगेश बाबर, पालिकेतील गटनेते राहुल कलाटे, महिला संघटिका सुलभा उबाळे, संघटक गोंविद घोळवे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सीमाप्रश्नांसाठी शिवसेनेने रक्त सांडले आहे. मात्र आज सत्तेत असलेल्या लोकांना त्याचे काही घेणे देणे नाही. मराठी माणसांविषयी प्रेम नाही, असे राज्यकर्ते आहेत. हे राज्य घालविणे गरजेचे आहे, असे सांगत राऊत पुढे म्हणाले, " मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस यांचे सरकार असून देखील मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नसल्यामुळे निराशा आहे. परंतु, आम्ही पाठपुरावा सोडणार नाही. प्रयत्न करत राहणार आहोत"

"सत्तेत राहून देखील जनतेचे हित पाहून सरकारच्या विरोधात बोलण्याची शिवसेनेत हिंमत आहे. सत्तेची आम्हाला फिकिर नाही. आजवर राज्यात विरोधी पक्ष आहे की नाही अशी परिस्थिती होती. आता कुठे राष्ट्रवादी हल्लाबोल, डल्लाबोल आंदोलन करत आहे. तर, काँग्रेस राज्यात अस्तित्वशून्य  असल्यासारख्या अवस्थेत आहे.  आगामी निवडणुकीचे आम्ही रणशिंग फुकले आहे. आमचा पहिला विरोधक भाजप असणार आहे, कारण तो  सत्तेत आहे. सत्ताधारी पक्षच पहिला विरोधक असतो, असेही राऊत म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.