Pimpri : पिंपरी महापालिकेतील भाजपच्या ‘पारदर्शक’ कारभाराची पंतप्रधानांकडे तक्रार


एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या पैशाची खुलेआम लूट सुरू केलीय. शहरातील रस्त्यांच्या करोडोंच्या कामात रिंग करून महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला जात आहे.पारदर्शकतेच्या नावाखाली सुरू असलेल्या या उद्योगांची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेना शहरप्रमुख युवराज दाखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

युवराज दाखले यांनी पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात म्हटलयं की, आपण स्वच्छ व पारदर्शक कारभार करणार असल्याचे आश्वासन देऊन केंद्रात व राज्यात त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरात भाजपा सरकारची सत्ता मिळवली. परंतु जनतेने दिलेल्या सत्तेचा पिंपरी चिंचवड महापालिकेत खूप दुरुपयोग होत आहे. महापालिकेतील अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी वर्ग या राजकीय पुढाऱ्यांच्या जाचाने त्रस्त झालेले आहेत.

शहरातील रस्ते डांबरीकरणासाठी आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला जगविण्यासाठी करोडो रूपयांची कामे ‘रिंग’ करून जनतेच्या तिजोरीवर डल्ला मारला जात आहे. पिंपरी महापालिकेत असलेल्या स्थायी सामिती प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा अतिविश्वासु सहकारी व भाजपचा स्वयंघोषित नेत्याने महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचा ‘मास्टर प्लॅन’ केला आहे. वास्तविक पाहता निविदा प्रकिया ही खुल्या व स्पर्धेने होणे अपेक्षित होत. परंतु स्वतःच्या आर्थिक हितासाठी निविदा प्रक्रियेत जाचक अटी टाकण्यात आल्यात. जाचक अटीमध्ये प्रामुख्याने सांगायाचे म्हंटले तर ज्या ठेकेदाराचा डांबराचा प्लांन्ट आहे त्यालाच या निविदा प्रकियेत भाग घेता येत असून इतर ठेकेदारांनवर खूप मोठा अन्याय झाला आहे.

स्वयंघोषित नेत्याच्या या मनमानीमुळे या रस्त्याच्या निविदा प्रक्रीयेत स्पर्धाच झाली नाही. करोडोंच्या या कामात फार मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाला आहे. तरी आपण या प्रकरणाची दखल घेऊन गुप्तचर यंञनेद्वारे चौकशी करून संबधीतावर कारवाई करून जनतेला न्याय द्यावा अशी मागणी युवराज दाखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.